केरळ मधील शहरांना अशी मिळाली त्यांची नावे…


आपल्या देशामधल्या काही शहरांना त्यांची नावे कशी मिळाली हा इतिहास मोठा रोचक आहे. आपल्या देशामध्ये परंपरांची आणि संस्कृतींची विविधता आहेच, पण त्याशिवाय भारताबाहेरून आलेल्या लोकांनी देखील इथल्या शहरांना वेगळी वेगळी नावे दिली. केरळ मध्ये देखील अशी काही शहरे आहेत ज्यांच्या नावांच्या मागचा इतिहास अगदी विशेष आहे. केरळचा सर्वप्रथम उल्लेख दिसतो तो मौर्य साम्राज्याकालीन एका शिलालेखामध्ये. त्या मध्ये केरळचे नाव तेथील केरलीयन थंबोरन या राजाच्या नावावरून मिळाले असा उल्लेख सापडतो. थंबोरन राजा हा सम्राट अशोकाच्या समकालीन होता..अजून एक आख्यायिका अशी आहे की केरळ ह्या प्रांताचे नाव तेथे मुबलक प्रमाणात होणाऱ्या “ केरा “ म्हणजेच नारळ, यावरून पडले आहे. नारळाची झाडे ही केरळची खासियतच. अगदी खाण्यापासून ते घरे बांधण्यापर्यंत सर्वच कामात या कल्पतरूचा उपयोग होतो. म्हणूनच..केरळ म्हणजे नारळांचा प्रदेश. केरळ ला त्याचे नाव जसे नारळावरून मिळाल्याचे म्हटले जाते तसेच येथील काही शहरांना त्यांचे नाव कसे मिळाले हे ही पाहूया.
तिरुवनंतपुरम : ब्रिटीश साम्राज्य जेव्हा भारतामध्ये होते तेव्हा या शहराला त्रिवेंद्रम म्हटले जायचे. पण ब्रिटीश साम्राज्याच्या पूर्वी या शहराचे नाव तिरुवनंतपुरम असेच होते. ‘भगवान अनंत निवास करत असलेले नगर’ म्हणून या शहराला तिरुवनंतपुरम म्हटले जात असे. जगप्रसिद्ध श्री पद्मानाभस्वामी मंदिर हे भगवान अनंताचे देवस्थान आहे.

मुन्नार : केरळ मधील सुप्रसिद्ध असे हे पर्यटनस्थळ आहे. हे एक हिल स्टेशन असून इथे नजर जाईल तेथवर हिरव्यागार चहाच्या बागा दृष्टीस पडतात. वळणावळणाचा रस्ता, हिरव्या गार चहाच्या बागा असे सौंदर्य घेऊन नटलेल्या मुन्नारला त्याचे नाव मिळाले त्याचे कारण तिथल्या डोंगरांमधून वाहणारे तीन झरे आहेत. मुद्रपुहा, कुंडला आणि नाल्लाथन्नी अशी त्या तीन झर्यांची नावे आहेत. ‘मुन्न’ आणि ‘आरु’ हे मल्याळम शब्द ‘तीन’ आणि ‘झरे’ दर्शवितात.

पलक्कड : असे म्हटले जाते की इथे राहणारा जैन समुदाय पाली या भाषेचा उपयोग करीत असल्याने या शहराला पलक्कड हे नाव मिळाले, पण या बद्दलची दुसरी आख्यायिका अधिक पटणारी आहे. या प्रदेशामध्ये होणाऱ्या ‘पाला’ नावाच्या अतिशय सुवासिक झाडांमुळे या शहराला पलक्कड हे नाव मिळाले असे म्हटले जाते.

कोट्टायम : मसाले आणि रबर च्या झाडांसाठी जगप्रसिद्ध असणारे हे शहर आहे. या शहरामध्ये अठराव्या शतका पर्यंत अनेक किल्ले आणि महाल होते. पण त्रावणकोरचे राजे मार्तंड वर्मा यांनी या वास्तू जमीनदोस्त केल्या. आता या किल्ल्यांचे जरी फक्त काही अवशेष जरी शिल्लक असले तरी एके काळी ‘कोट्ट’ आणि ‘अकम’ म्हणजे किल्ल्यांनी वेढलेली अशी अशी हे कोट्टायम नगरी.

अंगामली : असे म्हटले जाते की जेव्हा युद्ध होत असत तेव्हा ती जंगलांमध्ये किंवा डोंगराळ भागांमध्ये न होता सपाट जमिनीवर होत असत. ‘अंक’ म्हणजेच युद्धांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ‘मयाल’ किंवा प्रदेशाने पूर्वी पुष्कळ युद्धे पहिली असावीत. म्हणून कदाचित अंगामली हे नाव या शहरास पडले असावे. सामानाची समुद्रामार्गे आवकजावक चालू असणारे हे एक बंदर आहे, म्हणून यास “आकामाली’ म्हणजे बंदर असे नाव पडले असल्यचे ही सांगितले जाते.

Leave a Comment