चक्क तृतीयपंथियांसाठी ‘त्याने’ बांधले ‘त्रिधारा’ शौचालय


कोलकाता – तृतीयापंथियांच्या हक्कांची गोष्ट जेव्हा निघते तेव्हा त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या घोषणा हवेत विरताना आपण नेहमीच बघतो. पण कोलकातातील केवळ २१ वर्षे वय असणाऱ्या सोभन मुखर्जीने तृतीयपंथियांकडे दयेच्या नजरेने नाही तर त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहताना जो निर्णय घेतला, तो मात्र नक्कीच कौतुकास्पद तर आहेच पण समाजासाठी एक आदर्श आहे.

जो विचार सोभनने केला, तो आपल्याला स्वप्नात सुद्धा आला नसता. तृतीयपंथियासाठी वेगळे सार्वजनिक शौचालय असावे ही कल्पना सोभनच्या डोक्यात आली. या कल्पनेला त्याने जिवंत रुप दिले. सोभनने उचललेल्या या धाडसी पावलामुळे आज कोलकाता शहराच्या दक्षिण बाह्यमार्गावरील बान्सद्रोनी या परिसरात तृतीयपंथियासाठी सार्वजनिक शौचालये उभी राहिली आहेत.

सोभनच्या डोक्यात आलेली कल्पना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने शेवटी ही कल्पना वार्डातील नगरसेवक अनिता कर मजुमदार यांच्याकडे बोलून दाखवली. अनिता यांनीही तेवढाच उत्साह दाखवत यासाठी पुढाकार घेतला. सोभन व अनिता यांनी वार्ड क्रमांक ११२ मध्ये असलेल्या पाच सार्वजनिक शौचालयांपैकी ४ मध्ये तृतीयपंथियांसाठी वेगळे शौचालय बनवले.

आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ट्रान्सजेंडर चिन्हे या शौचालयांच्या दरवाजांवर आहेत. या शौचालयांना सोभनने ‘त्रिधारा’ असे नाव दिले आहे. तृतीयपंथियांना होणाऱ्या वेदना सोभनने समजून घेत सवंदेनशीलतेचा जो परिचय दिला आहे, तो नक्कीच समाजासाठी आदर्श घेण्यासारखा आहे.

Leave a Comment