एका जागेचे महाभारत


राज्यसभेच्या गुजरातमधून निवडून द्यावयाच्या ३ पैकी एका जागेसाठी मोठे राजकारण झाले आणि त्यात भाजपाचा डाव साधला नाही. कॉंग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव घडवून आणण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी केलेली फिल्डिंग वाया गेली. अहमद पटेल विजयी झाले. त्यांच्या विजयाविषयी सर्वांनाच शंका वाटत होती. परंतु खुद्द अहमद पटेल आणि त्यांच्या रक्षणकर्त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षा हे दोघेही पटेल यांच्या विजयाविषयी साशंक होते. भारतीय जनता पार्टीने पक्षात फाडाफोड केली तर पक्षाची अपेक्षित असलेली मते अहमद पटेल यांना मिळणार नाहीत आणि पराभवाचा अनुभव घ्यावा लागेल असे या दोघांनाही वाटत होते. प्रत्यक्षात अगदी निसटत्या एका मताने अहमद पटेल विजयी झाले. हा विजय जाहीर होताच, अहमद पटेल यांनी डरकाळ्या फोडायला सुरूवात केली. राज्यसभेची निवडणूक तर जिंकलेलीच आहे आता विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू अशी बढाई अहमद पटेल यांनी मारली आहे.

खरे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेससाठी सामान्य माणसांची १०० सुध्दा मते प्रभावित करण्याची क्षमता अहमद पटेल यांच्यात नाही. त्यांना जनतेत कसलेच स्थान नाही. केवळ मोठ्या नेत्यांच्या पुढे पुढे करून दरबारी राजकारण करण्यात ते वाकब्गार आहेत. विविध पक्षात फाडाफोडी करणे, पक्षाचे आणि देशाचे राजकारण चालवण्यासाठी आवश्यक असलेली संघटनात्मक सूत्रे दिल्लीत बसून हलवणे याशिवाय त्यांच्याकडे कसलीही क्षमता नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्याच चुकीने केवळ एका मताने राज्यसभेची निवडणूक जिंकल्याबरोबर जणू काही आपण भाजपावर कायम वरचढ ठरणार आहोत अशा भ्रमात त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या वल्गना सुरू केल्या आहेत. त्यांच्या या वल्गना कशा फोल आहेत हे समजून घेण्यासाठी राज्यसभेच्या निवडणुकीत नेमके काय घडले. हे समजून घ्यावे लागणार आहे. ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा कॉंग्रेसचे ५७ आमदार होते आणि त्यांच्या मतांच्या जोरावर अहमद पटेल हे राज्यसभेवर सहजपणे निवडून येऊ शकत होते. परंतु राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसच्या एकेका आमदाराची गळती सुरूरू झाली. त्यामुळे आपण विजयी होऊ शकू की नाही या विषयी अहमद पटेल आणि सोनिया गांधी साशंक व्हायला लागल्या. मात्र त्या दृष्टीने काही हालचाली करण्याच्या आधीच कॉंग्रेसचे दहा-बारा आमदार भाजपाच्या गळाला लागलेही होते.

पक्षांतराने हादरलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी उरलेले ४५ आमदारही भाजपात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली आणि उरलेल्या ४५ आमदारांना बंगळुरुमध्ये नेऊन ठेवले. निदान हे तरी सगळे आमदार आपल्या पाठीशी उभे राहून ते अहमद पटेल यांना निवडून आणतील अशी त्यांची आशा होती. कॉंग्रेसवर अशी पाळी यावी ही गोष्टच मुळातत नामुष्कीची आहे. आता अहमद पटेल निवडून आले म्हणून त्यांनी कितीही बढाया मारल्या तरीही हा विजय फार अपघाताने आणि तांत्रिक चुकीने मिळाला आहे. बंगळुरुमध्ये नेऊन ठेवलेले ४५ आमदारसुध्दा अहमद पटेल यांच्या मागे नव्हते. बंगळुरूमध्ये नेऊन ठेवून आणि सगळ्या प्रकारचा दबाव आणूनसुध्दा त्यातले दोन-तीन आमदार फुटलेच आणि त्यामुळे ४४ मते मिळण्याची गरज असलेल्या अहमद पटेल यांच्या मागे उभे असलेले संख्याबळ ४२ पर्यंत खाली आले. फुटलेल्या दोन आमदारांनी भाजपाला मतदान केले. परंतु त्यांनी अमित शहा यांना दाखवून मतदान केले. त्यामुळे त्यांची मते बाद झाली. शिवाय जनता दल (यू) च्या एका आमदाराने काही कारण नसताना अहमद पटेल यांना मत दिले. नंतर त्याने तसे कबूलसुध्दा केले.

दाखवून मतदान केलेल्या दोन आमदारांची मते बाद झाली. म्हणजे भाजपा उमेदवाराचे संख्याबळ अहमद पटेल यांच्यापेक्षा जास्त होते पण ते दोन मते वजा झाल्याने एक मताने कमी झाले आणि अहमद पटेल विजयी झाले. अहमद पटेल यांचा विजय कॉंग्रेसची ताकद दाखवून, लोकांना धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व पटवून वगैरे काही झालेले नाही. त्या दोन कॉंग्रेस आमदारांनी दाखवून मतदान करण्याची चूक केली म्हणून अहमद पटेल विजयी झाले आहेत. कॉंग्रेसची खरे म्हणजे अब्रूच जायची परंतु त्याच पक्षाच्या दोन आमदारांच्या तांत्रिक चुकीने ती वाचली. परंतु अहमद पटेल आपला जणू काही देदिप्यमान विजय आहे असा देखावा उभा करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहेत. शेवटी विजय तो विजयच असतो. कोणाच्या चुकीमुळे झाला आणि कोणाच्या गफलतीमुळे झाला यामुळे काही फरक पडत नाही. तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष करण्यात चूक काही नाही. परंतु या राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या राजकारणात कॉंग्रेसची अवस्था काय झाली आहे पाहू लागलो म्हणजे त्या पक्षाची दया येते. अहमद पटेल विजयी झाले असले तरी या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे ५७ आमदार विधानसभेत होते. ती संख्या निवडणूक झाल्यानंतर ४४ वर आलेली आहे. हा खरे म्हणजे कॉंग्रेसचा पराभवच आहे. परंतु अहमद पटेल मोठमोठ्या आरोळ्या ठोकायला लागले आहेत आणि त्यांच्या आरोळ्या किती व्यर्थ आहेत हे विधानसभेच्या निवडणुकीत दिसणारच आहे.

Leave a Comment