डाव्या पक्षात अजून एक फूट


राज्यसभेच्या गुजरातमधून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी म्हणजेच अहमद पटेल यांच्या जागेसाठी किती मोठे राजकारण झाले हे कालच दिसले आहे. अशाच एका जागेसाठी डाव्या कम्युनिष्ट पक्षामध्ये सध्या एक विचित्र संघर्ष सुरू झाला आहे. गेली १० वर्षे पक्षाच्या ताकदीवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सीताराम येचुरी यांना आता पुन्हा संधी मिळणार नाही. म्हणजे पक्ष त्यांना पुन्हा संधी द्यायला तयार नाही. पक्षाच्या नियमानुसार हे घडत आहे. परंतु सीताराम येचुरी यांचे समर्थक त्यांना तिसरी टर्म मिळाली पाहिजे याबाबत आग्रही आहेत. पक्षाच्या नियमाला अपवाद करून त्यांना तिसर्‍यांदा पुन्हा संधी द्यावी अशी मागणी आहे. परंतु पक्षाचे सचिव मंडळ नियमाला अपवाद करण्यास तयार नाहीत. हा सरळ सरळ एका नियमाचा प्रश्‍न आहे. परंतु येचुरी यांच्या समर्थकांनी त्यामागे पक्षातल्या केरळ गटाचा डाव असल्याचा आरोप करायला सुरूवात केली.

सीपीएममध्ये सीताराम येचुरी विरुध्द प्रकाश कारत असा संघर्ष गेल्या काही वर्षांपासून उद्भवला आहे. खरे म्हणजे हा पक्ष एवढा छोटा आणि मर्यादित आहे की पक्षात फार मोठा संघर्ष आणि गटबाजी होण्याची काही शक्यताच नाही. परंतु भारतातल्या डाव्या चळवळीला फुटीचा शापच लागलेला आहे. वास्तविक पाहता डावी चळवळ किंवा समाजवादी विचार हा अपयशी असल्याचे दिसत आहे. त्याच्या विषयी देशातल्या तरुण पिढीला अजिबात आकर्षण नाही. तिच्या वाढीला बर्‍याच मर्यादा आलेल्या आहेत. परंतु वाढ खुंटलेल्या आणि खुरटलेल्या या चळवळीतसुध्दा अनेक पक्ष आणि विविध पक्षात अनेक गट कार्यरत आहेत. पक्षाची विचारसरणी आणि समाजाप्रती असलेले तिचे कर्तव्य याच्याशी या नेतेमंडळींना काही देणेघेणे नाही. त्यांचा आपला अहंकार सांभाळण्याचा कार्यक्रम जारी आहे.

त्यातूनच १९९६ साली मार्क्सवादी नेते ज्योती बसू यांना मिळालेली पंतप्रधान पदाची संधी गमावली गेली. भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्हींपासून दूर असणार्‍या सगळ्या राजकीय पक्षांनी ज्योती बसूंच्या नावाची शिफारस केली होती. परंतु त्यांच्या माकपातली गटबाजी उघड झाली आणि त्यातून बसू यांच्या हातची संधी निसटली. वास्तविक हा पक्ष अडीच राज्यात कार्यरत आहे आणि त्याही राज्यातले त्यांचे वर्चस्व हळूहळू कमी होत चाललेले आहे. अशा विनाशकालातसुध्दा त्यांना गटबाजी सुचावी हे मोठे दुर्दैवच आहे. सीताराम येचुरी आणि प्रकाश कारत यांच्यातले वैमनस्य इतके टोकाला गेले आहे की कदाचित त्यातून या पक्षाचे दोन पक्षात विभाजनसुध्दा होण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a Comment