संशोधकांनी तयार केले कृत्रिम अन्न


जगभरात विकसनशील देशांना विकसित देशात परिवर्तित करण्यात मुख्य अडथळा असलेल्या कुपोषण व भूक या प्रश्नांवर संशोधकांनी कांही तोडगा काढला असून फिनलंडच्या संशोधकांनी अतिशय पौष्टिक असे कृत्रिम अन्न हवा, वीज व बॅक्टेरियाचा वापर करून तयार केले आहे. जगभरात पाच वर्षांखालील ३० लाख मुले कुपोषणामुळे मरण पावतात. तसेच बालकांप्रमाणेच मोठ्या माणसांच्या कुपोषणाची समस्याही गंभीर आहे. त्यावर हे संशोधन उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे जगातील ७ कोटी ९५ लाख नागरिकांना पोटभर अन्न मिळत नाही म्हणजेच प्रत्येक ९ नागरिकामागे १ कुपोषित राहतो. त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईड, बॅक्टेरिया व वीज यांच्या वापरातून अशी पूड तयार केली आहे ज्यात प्रोटीनचे प्रमाण ५० टक्के व २५ टक्के कार्ब व बाकी अन्य फॅटस आहेत. ही पूड सध्या खाण्यायोग्य नाही मात्र भविष्यात ती जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकते. त्यामुळे जनावरांच्या खादयामुळे अन्नधान्यांवर येणारा ताण कमी करता येणार आहे तसेच मांसाहारी पदार्थांच्या किमती नियंत्रणात आणता येणार आहेत. हे अन्न तयार करण्यासाठी जादा जमीनीची गरज नाही. कारण याचा कच्चा माल हवेतूनच मिळणार आहे.

हा पदार्थ नैसर्गिक खाद्यापेक्षा १० पट अधिक पोषक असल्याचा दावा केला जात असून हे तंत्रज्ञान वापरून तयार झालेले अन्न वाळवंटी भागात अथवा दुष्काळी भागात त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो तसेच हे तंत्रज्ञान वापरून घरगुती रिअॅक्टरचा वापर केला तरी स्वतःच हे पदार्थ तयार करणेही माणसाला शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात त्यावर आणखी संशोधन केले जात आहे.

Leave a Comment