बंगलोरचे सत्यनारायण नोटांच्या ढिगांवर करतात लक्ष्मीपूजन


दिवाळीत होणारे लक्ष्मीपूजन अथवा श्रावणात होणारे वरदलक्ष्मी पूजन हे बहुतेक सर्वांच्या परिचयाचे आहे व अनेक घरांतून ही लक्ष्मीपूजा केली जाते. मात्र ही पूजा करताना लक्ष्मी व नोटा अथवा पैसे यांचे पूजन होते. बंगलोरमधील एक व्यावसायिक सत्यनारायण यांच्या घरीही वरद लक्ष्मी पूजन होते. मात्र या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे सत्यनारायण नोटांचे भलेमोठे आसन देवीसाठी तयार करतात व त्यावर मूर्ती ठेवून पूजा करतात. त्यांच्या घरातील या पूजेचे कांही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

यात देवी पूजेसाठी नोटांचे ढीग, भलीमोठी मूर्ती व दागदागिने मांडलेले दिसत आहेत. सत्यनारायण हे बंगलोर डेव्हलपमेंट अॅथॉरिटी साठी ब्रोकर म्हणून काम करतात. ते सांगतात ही पूजा करताना आम्ही घरातील सर्वांच्या बँक अकौंटमध्ये असणारे पैसे काढून पूजा करतो. गेली १० वर्षे ते याच पद्धतीने पूजा करत आहेत. या पूजेत १००,५०० व आता २ हजार च्या नोटांची बंडले असतात. या नोटांची रक्कम ३० लाखांपासून यंदा ७३ लाखांवर पोहोचली आहे. सत्यनारायण यांच्या म्हणण्यानुसार हा सर्व पैसा वैध मार्गाने मिळविलेला आहे व ते कधीही त्या संदर्भातली कागदपत्रे सादर करू शकतात.

Leave a Comment