जगातील एकमेव त्रिनेत्री गणेश


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रणथंबोर किल्यात शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम झाला अ्सून जगातील एकमेव असे त्रिनेत्री गणेशाचे मंदिर येथे आहे. या मंदिराला दरवर्षी जगभरातून लाखो भाविक भेट देत असतात. येथील गणेशाची प्रतिमा स्वयंभू आहे आणि त्याचा तिसरा नेत्र हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात गणेश सहकुटुंब आहे. म्हणजेच गणेश प्रतिमेबरोबर पत्नी रिद्धीसिद्धी व दोन पुत्र शुभ आणि लाभ हेही येथे विराजमान आहेत.

असे सांगतात की विक्रम संवत सुरू करणारा राजा विक्रमादित्य दर बुधवारी या गणेशाची पूजा करण्यासाठी राजधानी उज्जेन मधून येथे येत असे. राजा हमीरदेव यांच्यावर अल्लाद्दिन खिलजीने हल्ला चढवून त्याच्या रणथंबोर किल्ल्याला ९ महिैने वेढा घातला होता. किल्ल्यातील रसद संपत आली तरी वेढा उठण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा गणेशाने स्वप्नात येऊन राजाला त्यांचे मंदिर येथे बांधण्यास सांगितले व त्यांनतर राजावरचे खिलजी चे संकट टळले अशीही कथा सांगतात.


अन्य एका कथेनुसार श्रीकृष्णाने रूक्मिणीसोबत विवाह केला तेव्हा या गणेशाला आमंत्रण देण्यास तो विसरला. तेव्हा नाराज झालेल्या गणेशाने त्याच्या मूषक फौजेला कृष्णाचा मार्ग पोखरून ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे कृष्णाचा रथ रस्त्यात रूतला. चूक लक्षात येताच कृष्णाने गणेशाला या जागी येऊन विवाहाचे निमंत्रण दिले. तेव्हापासून विवाहाचे पहिले निमंत्रत्र गणेशाला देण्याची प्रथा पडली असे मानले जाते.शंकर महादेवाने आपला तिसरा नेत्र गणेशाला उत्तराधिकारी म्हणून दिल्याची कथाही सांगितली जाते यामुळे शंकराच्या सर्व शक्ती गणेशात आल्या असाही विश्वास आहे.