राजनाथ सिंह यांचा सवाल


कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पूरग्रस्त गुजरातमधील बनासकाठा भागात दौरा काढला असता त्यांच्यावर दगडफेक झाली आणि जमावाने त्यांना राहुल गांधी गो बॅक अशा घोषणा देऊन विरोध केला. ही दगडफेक म्हणजे एरवी दंगलीत होते तशी दगडफेक नव्हती. तर राहुल गांधींच्या कारवर दोन दगड फेकण्यात आले होते. त्यातला एक दगड लागण्यापासून राहुल गांधी थोडक्यात बचावले. परंतु त्यांच्या अंगरक्षकाला एक दगड लागून तो जखमी झाला. या गोष्टीचे भरपूर भांडवल करून भरपूर प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी सुरू केला आहे आणि तो साहजिक आहे. विशेषतः या दगडफेकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला कार्यकर्ता हा भाजपाचा असल्यामुळे राहुल गांधी आणि कॉंग्रेसजनांना मोठा जोर चढला आहे.

या प्रकरणावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत मोठा गोंधळ घातला. मात्र राज्यसभेतच गोंधळ घातल्यामुळे गृहमंत्र्यांचे निवेदन त्यांना ऐकावे लागले. ज्या निवेदनामुळे राहुल गांधींचीच पंचाईत झाली. कारण गृहमंत्र्यांनी राहुल गांधी हे सरकारकडून दिले जाणारे संरक्षण का नाकारतात असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधींना दगड लागला असता तर दगडफेक करणार्‍याला तर दोषी समजले गेले असतेच पण केंद्र सरकार त्यांना पुरेसे संरक्षण देत नाही असाही ठपका सरकावर ठेवला गेला असता. म्हणून राजनाथ सिंह यांनी सरकारकडून दिल्या जाणार्‍या संरक्षणाबाबत खुलासा करून राहुल गांधींचीच गोची केली.

राहुल गांधी सरकारच्या संरक्षणाला नकार देतात, असे वारंवार दिसून आले आहे. याचा उल्लेख गृहमंत्र्यांनी केला. नुकत्याच पार पडलेल्या गुजरातच्या दौर्‍यामध्ये पोलिसांनी राहुल गांधींसाठी बुलेट प्रुफ गाडी देऊ केली होती. ती त्यांनी नाकारली, पोलिसांचे कडेही नाकारले आणि ते खासगी गाडीने गेले. ते पोलिसांचे ऐकत नव्हते. त्यांच्या खासगी सचिवांनी दिलेल्या सूचनाच ते पाळत होते, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राहुल गांधी गेल्या दोन वर्षांमध्ये सहावेळा एकूण ७२ दिवस परदेश दौर्‍यावर होते. तिथेही ते पोलिसांचे संरक्षण नाकारत होते. अशा परदेश दौर्‍यात काही विपरित घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही गृहमंत्र्यांनी केला. राहुल गांधींना परदेशाच्या दौर्‍यावर असताना पोलीस संरक्षण का नको आहे? त्यांना पोलिसांपासून काय लपवायचे असे मर्मभेदी दोन प्रश्‍नही गृहमंत्र्यांनी विचारले आणि राहुल गांधींची पंचाईत केली.

Leave a Comment