फड जिंकला आता तड लावा


नुकतीच व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीसाठी खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहातली पक्षनिहाय संख्या विचारात घेतली तर नायडू यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवली. आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या सभापती अशा चारही पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निवडून आले आहेत. संघाच्या ज्या स्वयंसेवकांनी भाजपाच्या वाढीसाठी जे कष्ट केले आहेत त्यांचे चीज झाले आहे आणि त्यांचे स्वप्न साकार झाले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या चार पदांशिवाय देशातल्या २९ पैकी १८ राज्यांत भाजपाच्या हातात सत्ता आहे. त्यातल्या १३ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री असून पाच राज्यात भाजपा हा सत्तेतला कनिष्ठ भागीदार आहे.

लोकसभेसोबतच राज्यसभेतही भाजपाची सदस्य संख्या सर्वात जास्त झाली आहे. देशातली सत्ता आता भाजपाच्या हातात आहे. तेव्हा हा क्षण कृतार्थतेचा आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पण भाजपाचे नेते कृतकृत्य झाले असले तरी जनतेला यातून काय मिळणार आहे ? आता भाजपाला हवा तसा देश घडला पाहिजे असे लोक म्हणत असतील तर त्यात काही वावगे नाही. तेव्हा आता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी झपाट्याने पावले टाकून देशाचे चित्र बदलण्याचा आपला अजंेंडा राबवला पाहिजे. आता त्यांना कसलाही बहाणा सांगण्याची सोयी राहिलेली नाही. आजवर भारतीय जनता पार्टीने निरनिराळ्या निवडणुकांत जनतेला जी आश्‍वासने दिली आहेत त्यांची पूर्तता करण्यात काही अडथळा येण्याचे कारण नाही.

आता थेटच सांगायचे तर भाजपाने जनतेला आपण घटनेला हात लावणार नाही याची शाश्‍वती दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गेेल्या तीन वर्षात केन्द्रातल्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराच आरोपही झालेला नाही आणि ज्या राज्यांत भाजपाच्या हातात सत्ता आहे तिथल्या सरकारांचे कामही तुलनेने स्वच्छ राहिलेले आहे. त्याचे कौतुक आता बस्स झाले. आता सर्व पातळयांवरचा भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजपाने लोकपाल विधेयक आणले पाहिजे आणि राज्या राज्यांत लोकायुक्तही नेमले जात आहेत की नाही हे पाहिले पाहिजे. आपला देश हरित क्रांती केल्याने गहू आणि तांदूळ यांबाबत स्वावलंबी झाला आहे पण तेल आणि डाळींच्या बाबतीत तो परावलंबी आहे. आपल्याला अजूनही मलेशियातून येणारे पाम तेल खावे लागते. ही नामुष्की पुसली गेली पाहिजे तरच देशात भाजपाच्या हातात सत्ता गेल्याचा लाभ जनतेच्या पदरात पडेल.

Leave a Comment