बहुजन समाज अघाडी


दिल्लीत काल झालेल्या एका व्यापक बैठकीत बहुजन समाज आघाडी ही नवी संघटना स्थापन करण्यात आली. बहुजन समाज असा शब्द या संघटनेच्या नावात आहे यावरून मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीत फूट पडून ही आघाडी स्थापन झाली आहे की काय अशी शंका कोणाला येण्याची शक्यता आहे पण अजून तरी मायावती यांच्या पक्षात फूट पडलेली नाही. तेव्हा ही आघाडी बसपातून निर्माण होण्याचा प्रश्‍नच नाही. असे असले तरीही ती बसपाला आव्हान देण्यासाठी नक्कीच तयार करण्यात आली आहे. या आघाडीचा बसपाशी तसा अगदीच संबंध नाही असेही नाही. या आघाडीच्या संयोजन समितीत बसपाचे माजी खासदार प्रमोद कुरील यांचा समावेश आहे. त्यांनी या समितीचे सदस्यत्व स्वीकारले आहे आणि आपण अजूनही बसपातच आहोत असा खुलासाही केला आहे. मात्र आपण मायावती यांच्या नेतृत्वाचा शेवट कधी होतो हे पहात आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. या आघाडीचा बसपाशी असलेला अजून एक संबंध सांगणे बाकी आहे.

ही समिती दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या निरनिराळ्या संघटनांची मिळून तयार झालेली आहे. अशा या १६ संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांचे नेते कधीना कधी बसपात होते आणि त्यांची मायावती यांचा रोष झाल्यामुळे पक्षातून कधी तरी हकालपट्टी झालेली आहे. तेव्हा मायावती यांच्यामुळे दुखावलेले असणे आणि मायावती यांचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असणे हे दोन समान हेतू या आघाडीतल्या सगळ्याच संघटनांच्या आणि नेत्यांच्या मनात आहेत. बसपाचे माजी खासदार प्रमोद कुरील आणि नुकतेच बसपातून बडतर्फ झालेले नेते नसिरुद्दीन सिद्दीकी यांचा ही आघाडी स्थापन करण्यात पुढाकार आहे. नसिरुद्दीन सिद्दीकी यांनी मायावती यांचा भंडाफोड केला आहे आणि त्या आपल्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी कशी पैशाची मागणी करीत होत्या हेही जाहीर केले आहे. त्यावर सिद्दीकी यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. पक्षातून बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतली ही बाबही फार महत्त्वाची मानली जात आहे. या सगळ्या संघटना उत्तर प्रदेशातल्या आहेत. एकंदरीत या आघाडीच्या स्थापनेत भाजपाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी राज्यात भीम सेना स्थापन झाली असून तिच्याकडे राज्यातल्या दलित युवकांचा मोठा ओढा आहे. ही सेना कधीही राजकारणात जाणार नाही असे तिच्या संस्थापकांनी जाहीर केले आहे. त्यांंनी राजकारण केले नाही तरी तिच्यावरून होणारे राजकारण काही टळत नाही.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला पण त्यांच्या निधनानंतर या पक्षात फूट पडली. कारण सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद असलेला एकही नेता या पक्षात नव्हता. त्या नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार राजकारण केल्यामुळे नव्या पिढीतल्या कार्यकत्यार्ंंच्या मनातला रिपब्लिकन नेत्यांविषयीचा आदर कमी झाला. अशा संतापलेल्या युवकांनी १९७२ सालच्या आसपास दलित पँथर्स ही संघटना स्थापन केली. पण याही संघटनेचा लढावू बाणा एक पिढीतच संपला. आता पुन्हा एकदा हा समाज रिपब्लिकन पार्टीच्या नव्याने निर्माण झालेल्या गटांत वाटला गेला आहे. स्थापनेला लढावू वृत्ती आणि एक पिढी पार झाली की मवाळ वृत्ती अशा प्रक्रियेतून दलित समाजाचे राजकारण वाटचाल करीत आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीची वाटचाल अशीच जारी आहे. कांशीराम यांनी स्थापन केलेल्या या पक्षात सुरूवातीला मायावती यांचे लढावू नेतृत्व उभे राहिले. १९९० च्या दशकात या नेतृत्वाने उत्तर प्रदेशातल्या राजकारणावर आपला ठसा उमटवलाच पण तो एवढा प्रभावी होता की, त्यांना चक्क देशाच्या पंतप्रधान होण्याच्या कल्पनेने घेरले.

मायावती यांनी आपले या पक्षातले स्थान एवढे बळकट आणि प्रभावी केले होते की, त्यांच्याशी मत भेद असलेल्या प्रत्येकाला त्यांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. अनेक नेते बाहेर पडले पण मायावती यांचा बसपातला वरचष्मा कमी झाला नाही आणि देशाच्या राजकारणात दलित नेत्या म्हणून त्यांचाच आवाज बुलंद झाला. पक्षाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले पण त्या प्रत्येक वेळा मुख्यमंत्री मायावतीच होणार हे एवढे पक्के ठरले होते की अन्य कोणा नेत्याच्या नावाची चर्चाही कधी झाली नाही. पक्षातल्या आपल्या या अधिकारात त्यांनी आपला पक्ष आपल्या मर्जीला येईल तसा चालविला. कधी मुस्लिमांशी आघाडी केली तर कधी ब्राह्मणांना जवळ केले. या सगळ्या आघाड्या करताना त्यांनी आपल्या पक्षात कोणाला विचारलेही नाही. पण दरम्यान पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची संख्या दोन डझनावर गेली. अनेक नेते नाराज होते पण मायावती यांची दलित मतपेढीवरची पकड एवढी घट्ट होती की, त्यातल्या कोणत्याही नेत्याने थेट मायावती यांना कधीच आव्हान दिले नाही. आज मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एवढा दारुण पराभव झाला आहे की, आता त्यांना कोणी घाबरेनासे झाले आहे. महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन नेत्यांप्रमाणे मायावती यांच्या निवृत्तीचा काळ आता जवळ आला आहे.

Leave a Comment