कर्नाटकातील बँका म्हणतात; कानडी येत नसेल तर नोकऱ्या सोडा


बंगळूरू – येत्या ६ महिन्यात कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा अशा स्वरुपाची धमकीवजा नोटीस ‘कर्नाटका विकास प्राधिकरण’ने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. हे आदेश कानडी बोलू न शकणाऱ्या प्रादेशिक प्रमुखांना देण्यात आले आहेत. हे आदेश कर्नाटकमधील राष्ट्रीय, खासगी आणि ग्रामिण अशा सर्व बँकांमध्ये देण्यात आले आहेत.

प्राधिकरणनाने हे आदेश देते वेळी बँकेचे दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. स्थानिक भाषेचा वापर अशाप्रकारे केल्यास जास्तीत जास्त लोक बँक सेवेचा लाभ घेऊ शकतील. विशेषतः भाषेची समस्या ग्रामिण भागात भेडसावत असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांना कानडी येणे क्रमप्राप्त आहे असेही स्पष्ट केले. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला कानडीमध्ये माहिती एक ग्राहकाने चेकवर लिहीली होती आणि त्याचा चेक नाकारण्यात आला. यावरुन हा ग्राहक बॅंकेविरोधात न्यायालयात गेला होता.

आपल्या कर्मचाऱ्यांना कर्नाटका विकास प्राधिकरण अशाप्रकारे भाषेवरुन नोकरीवरुन काढू शकते का याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरीही हे निर्देश दक्षिण भागातील बँकांनी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार मोहिम सुरु करण्यात आली असून ट्विटरवर ‘अवर बँक निड कानडा’ अशा आशयाचे मेसेज टाकण्यात येत आहेत. अर्थिक क्षेत्रात स्थानिक भाषेचा वापर वाढावा हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment