गोव्यात बायोगॅसवर बस; प्रदूषणासह कचरा समस्येवर मार्ग


पणजी: जागतिक स्तरावर प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना होत असल्या तरी वाहनांची वाढती संख्या हीच अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातून प्रदूषणावर मात करण्यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांत गोवा अग्रेसर ठरले आहे. केवळ प्रदूषण नव्हे तर केरकचरा या प्रश्नावरही बायोगॅसवर बसेस चालविण्याचा प्रयोग करून आदर्शवत उपाय शोधला आहे.

गोव्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बायोगॅसवर चालणाऱ्या पहिल्या बसची चाचणी नुकतीच झाली. गोव्यामधील केरकचऱ्यापासून इथेनॉलची निर्मिती करून त्यावर या बसेस धावणार आहेत. परिणामी वाढत्या प्रदूषणातून गोव्याला दिलासा मिळणार असला तरी हा प्रयोग व्यापक स्तरावर अंमलात आणून त्याद्वारे प्रदूषणमुक्त गोवा ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी गोवा सरकारने कंबर कसली आहे. पर्यावरणपूरक इंधनावर या बसेस चालविण्याचा प्रयोग जरी असला तरी या प्रयोगाद्वारे केरकचऱ्याचा भेडसावणारा प्रश्नही संपुष्टात कसा आणता येईल; यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या बायोगॅसवर चालणाऱ्या पहिल्या बसची चाचणी घेण्यात आली असून केरकचऱ्यापासून इथेनॉल या बायोगॅसची निर्मिती या प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो देशासह जागतिक स्तरावर आदर्शवत ठरेल असा आशावादही गोवा सरकारने व्यक्त केला आहे.

Leave a Comment