राखी सावंतला ठोका बेड्या ; न्यायालयाचे आदेश


नवी दिल्ली – अभिनेत्री राखी सावंतला महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह विधान करणे चांगलेच महागात पडले आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज लुधियाना येथील न्यायालयाने फेटाळला असून तिच्या अटकेचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.

५ ऑगस्टला राखीला जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच ७ ऑगस्ट रोजी न्यायालयात शरण यावे, असे सांगितले होते. पण राखी सावंत न्यायालयात हजर राहू शकली नाही. राखी अमेरिकेत असल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. जामिनासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंतीही वकिलांनी अर्जाद्वारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरबीर सिंग यांच्याकडे राखीच्या वतीने केली आहे. पण तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत तिच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

वाल्मिकी समाजाच्या भावना राखी सावंतच्या वक्तव्याने दुखावल्या असल्याचे म्हणत ९ जुलै २०१६ रोजी वकील नरिंदर आदित्य यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वाल्मिकी समाजाची राखीने बिनशर्त माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले होते. राखीने एका मुलाखतीमध्ये वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. या प्रकरणी अॅड. नरिंदर आदिया यांनी राखीविरोधात तक्रार दाखल केली होती.