काश्मीरमधली कांही अपरिचित पर्यटनस्थळे


काश्मीरचा प्रवास आजही पर्यटकांत विशेष लोकप्रिय आहे व अनेकजण काश्मीरला जाऊन आलेही आहेत. त्यात सर्वसाधारणपणे जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम ही स्थळे आवर्जून पाहिली जातात. मात्र अशीच आणखीही काही स्थळे तेथे आहेत जी फारशी परिचयाची नाहीत. मात्र या स्थळांची भेट हाही वेगळा अनुभव आहे. तेव्हा पुन्हा काश्मीरला जायचे असेल तर तुमच्या पर्यटनस्थळ यादीत यांचीही नोंद अवश्य ठेवायला हवी.


गुरेज व्हॅली ला भेट दिली तर आपण एखाद्या चित्रमय दरीतून जात आहोत असा भास झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णगंगा नदीचे हे खोरे आपल्याला एकदम भारून टाकते. खळाळून वाहणार्‍या नदीच्या पार्श्वभूमीवर पिरामिडच्या आकाराचा हब्बा खातून पर्वत डोळ्यांवरची मोहिनी उतरू देत नाही. हब्बा खातून प्रसिद्ध काश्मीरी कवियत्री होती व तिच्या नावावरूनच हे नांव पडले आहे. प्राचीन सिल्क रूटचा हा भाग आहे. बाकी काश्मीरपासून हा भाग वर्षातले सात महिने तुटलेला असतो कारण आक्टोबर ते मार्च दरम्यान येथे प्रचंड बर्फ असते. राझदान पासवरून येथे येता येते त्यासाठी हेलिकॉप्टर सेवा दिली जाते. श्रीनगर पर्यटन विभागातून त्याचे बुकींग करता येते.


लोलाव व्हॅली ही जम्मू काश्मीर राज्यातील सर्वात मोठी व्हॅली आहे. लहवाल नदीचे सानिध्य असलेल्या या खोर्‍यात पाईन, फरची दाट जंगले आहेत. काश्मीरचा फ्रुट बाऊल म्हणूनही ती ओळखली जाते. सफरचंद, चेरी, पीच, अक्रोड, जरदाळू यांची प्रचंड झाडे, हिरवी कुरणे व धार्मिक स्थळांची सफर येते करता येते. कुपवाडापासून येथे जाता येते.


अहरबल हे दक्षिण काश्मीर भागातले छोटेसे पण सुंदर हिलस्टेशन आहे. कुलगाम जिल्ह्यात झेलम नदीच्या उपनदीवरचे हे ठिकाण. येथील नयनरम्य धबधबा अतीव सुंदर असून त्याला काश्मीरचा नायग्रा म्हटले जाते. येथून कोसरनाग सरोवर ट्रेक करता येतो. श्रीनगर पासून ५० किमी वरील शोपेन येथून जवळ हे ठिकाण आहे. त्याचबरोबर दूध पथरी हे ठिकाण व्हॅली ऑफ मिल्क नावाने ओळखले जाते. ते बडगामपासून ४० किमीवर आहे. प्रचंड मोठी हिरवीगार कुरणे हे याचे वैशिष्ठ. येथे शांत, निवांत राहण्याचा आनंद उपभोगता येतो त्यासाठी इग्लू बांधले गेले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर हा काळ वरील ठिकाणांना भेट देण्यासाठी योग्य आहे.

Leave a Comment