गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये देशात अचानक जाहीर करण्यात आलेली नोटबंदी व ऑपरेशन व्हाईट मनी अभियानाचे दृष्य परिणाम आता नजरेत येऊ लागले असून २०१६-१७ साठी आयकर विवरणपत्रे भरणार्यांच्या संख्येत तब्बल २५ टकके वाढ नोंदविली गेली असल्याचे दिसून आले आहे. वैयक्तीक करदाते व हिंदू अविभक्त कुटुंब नियमाअंतर्गत आयकर विवरण पत्रे भरण्याची वाढीव मुदत ५ ऑगस्टला संपली त्यानुसार २ कोटी ८२ लाख करदात्यांनी त्यांची विवरणपत्रे या मुदतीत सादर केली आहेत असे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हीच संख्या २ कोटी २० लाख होती.
नोटबंदीचा परिणाम- आयकरदात्यांची टक्केवारी वाढली
आर्थिक तज्ञांच्या मते नोटबंदी व ऑपरेशन क्लिन मनी योजनेमुळे हे घडले आहे. इतकेच नव्हे तर नोटबंदी नंतर थेट कर वसुलीतही मोठी वाढ झाली असून अॅडव्हान्स टॅक्स कलेक्शन मध्ये वैयक्तीक करदात्यांच्या प्रमाणात यंदा ४१.७९ टक्के वाढ दिसून आली आहे. नोटबंदी झाल्यानंतर त्याचे दृष्य परिणाम दिसण्यासाठी कांही काळ जावा लागतो त्यानुसार आता हे परिणाम प्रत्यक्षात दिसू लागल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे.