चिनी रोबोंची सरकारशी गद्दारी


तंत्रज्ञानाची कमाल सध्या दुनिया अनुभवते आहे. माणूस जी कामे करतो ती रोबोंकडून करून घेण्यासाठी हरप्रकारचे रोबो जगभर तयार केले जात आहेत. अर्थात रोबोटिक्समध्ये जपान आघाडीवर असले तरी चीननेही रेाबोची फौज तयार करून जगभरात आपला झेंडा ऊंचा फडकत राहील हा प्रयत्न सातत्याने चालविला आहे. त्यात त्याची चांगली प्रगतीही होते आहे मात्र नुकताच चीन सरकारला या रोबोंनी चांगलाच झटकाही दिला आहे. परिणामी चीनी सरकारने या रोबोंवर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टेसेंट क्यूक्यू कंपनीने मार्चमध्ये चॅट रोबो बेबी क्यू अॅन्ड लिटल बिंग व ए पेंग्विन अॅन्ड लिटील गर्ल हे रोबो तयार केले व चॅट अॅपची सुरवात केली. मात्र या रोबोंनी केलेली वादग्रस्त विधाने सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ते त्वरीत बंद केले गेले. चिनी न्यूज सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार एप्रिल पासून कार्यरत केले गेलेले हे रोबो लोकांच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्याच्या दृष्टीने डिझाईन केले गेले होते मात्र राजकीय कठीण प्रश्नांची उत्तरे ते देण्यास असमर्थ ठरले.


न्यूज सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार हे रोबो हवामान, जन्मकुंडली यासारख्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देत होते मात्र नंतर ते रागीट, अधीर, हमला करण्यासाठी अतिसंवेदनशील बनत चालल्याचे लक्षात आल्यावर खोडकर सामाजिक मिडीया युजरनी त्यांना लक्ष्य केले व रोबो डिस्टर्ब होतील असे प्रश्न विचारले. राजकारणावरील कठीण प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांची तयारी नव्हती त्यामुळे रोबोंना कम्युनिस्ट पार्टी दीर्घकाळ टिकणार का असा प्रश्न केल्यावर बेबी क्यूने भ्रष्ट राज्य नेहमीसाठी असू शकत नाही असे उत्तर दिले. लोकशाही कशी असते या प्रश्नाला या रोबोंनी लोकशाहीची गरज आहेच असे उत्तर दिले.

बेबी क्यू रोबोंनी दिलेली ही उत्तरे चीन सरकारच्या विरोधातील मानली गेली आहेत. परिणामी हे रोबो तातडीने निलंबित केले गेले.