कोल्हापूर : शाडूच्या गणेश मूर्तीवर तब्बल २८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे जीएसटीचा फटका आपल्या लाडक्या बाप्पालाही बसला होता. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी हा टॅक्स कमी करावा अशी मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा करून हा टॅक्स २८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे. देशभरात मूर्तीकारांना याचा फायदा होणार आहे.
शाडूच्या गणेशमूर्तीवरील जीएसटीत झाली कपात
दरवर्षी आपण गणेश उत्सवाची आतुरतेने वाट पहात असतो. दरवर्षी गणेशमूर्तीना महागाईचा फटका तर बसतोच. पण यावर्षी जीएसटीचा फटका गणेशमूर्तींना बसला होता. तब्बल २८ टक्के जीएसटी केवळ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात तयार होणाऱ्या शाडूच्या घरगुती गणपतीच्या मूर्तींवर लावण्यात आला होता. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी हा टॅक्स रद्द करावा यासाठी लोकसभेत आवाज उठवला होता.
शाडूच्या गणेशमूर्तींवरील २८ टक्के जीएसटी हा कमी करुन तो काल दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या मिटिंगमध्ये ५ टक्के करण्यात आला आहे. तब्बल ६ ते ८ लाख शाडूच्या गणेश मूर्ती पश्चिम महाराष्ट्रात तयार केल्या जातात. तर महाराष्ट्र आणि देशात या आकडा किती होईल, याचा अंदाज यावरुन येईल. जीएसटी मुळे घरगुती शाडूच्या गणेश मूर्तींवरील दरामध्ये अधिक २८० ते ३०० रुपयांचा फरक पडणार होता. त्यामुळे सामान्य गणेशभक्त आणि मूर्तीकारही नाराज होते. गणेश उत्सव हा सावर्जनिक उत्सव असून त्यावरील संपूर्ण जीएसटी रद्द व्हावा, अशी मागणीही होत आहे. मात्र तुर्त तरी शाडूच्या गणेश मूर्तींवरील जीएसटी कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.