पहाडांच्या कुशीत वसलेली सुंदर शहरे


उंच उंच पहाडांच्या अंगाखांद्यावर वस्ती करणे तसे अवघड असले तरी जगातील अनेक शहरे या प्रकारे वसविली गेली आहेत. त्यातील कांही शहरे खूपच सुंदर असून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवर्जून भेटी देत असतात. परदेशातील अशाच काही मोहक शहरांची माहिती येथे देत आहोत.

कॅनडातील लोरेसियो हे असेच पडाडांच्या कुशीत वसलेले सुंदर शहर. थंडीच्या दिवसांत हे शहर बर्फाची चादर ओढून घेते व त्याच्या वेगळ्याच सौंदर्याचे दर्शन त्यावेळी घडते. येथे पर्यटक येतात ते प्रामुख्याने स्किईंगची मजा लुटायला. उंच बर्फाच्छादित पर्वतांवरून वेगाने घसरत येणारे स्कीअर्स पाहणे हेही फार मनोरंजक असते.


ऑस्ट्रीयातील सल्जबर्ग या गावी तुम्ही अगदी एकदोन रात्रींसाठी मुक्काम केलात, तरी हा स्टे आयुष्यभराची आठवण तुमच्यासाठी देतो. ट्रेनने येथे जाता येते. येथील मिराबेल गार्डन संगीतप्रेमींसाठी खास जागा आहे. ऑस्ट्रीयातील हॉल्स्ट्रेट हे छोटेसे लेकसाईड गावही असेच सुंदर आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत याची नोंद केली आहे. येथे खूपच पारंपारिक घरे पाहायला मिळतात. येथे राहणे हाही अविस्मरणीय अनुभव आहे.


स्वित्झर्लंडमधील डेवोस हेही असेच सुंदर शहर. या गावाला नगरपालिका आहे व हिवाळी खेळांसाठी ते प्रसिद्ध आहे. शिवाय वार्षिक विश्व आर्थिक मंचाचे आयोजन येथे केले जाते व त्याला जगभरातून बडे नेते येतात. हे चिमुकले शहर म्हणजे येथील पहाडांचे हृदय समजले जाते.स्वित्झर्लंडमधील जमै हे स्विस नागरिकांसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेच पण येथे पायी जावे लागते. येथे व्हिजिटर्ससाठी सुंदर रेस्टॉरंटस व पार्कची रेलचेल आहे.


टिग्नेसवॉल क्लेरेट हे फ्रान्समधले शहर आल्पस पर्वतरांगांच्या अंगावर वसलेले आहे. हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही क्लब मेड सारख्या महागड्या ठिकाणी राहू शकता किवा अगदी पर्वताच्या अंगावर असलेल्या टिग्नेस सुविधांचा लाभ घेऊ शकता.येथे तुम्हाला निवासासाठी उत्तम सुविधा मिळतात. फ्रान्समधील ला प्लारो हे असेच एक गांव. याचे वैशिष्ठ म्हणजे हे हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध आहे व येथे १४० किमीचा स्किईंग रूट आहे. येथे पहाडी आयुष्याची वेगळीच मजा लुटता येते.


कोलोराडोमधील टेलुराईड हे असेच सुंदर ठिकाण. खूपच छोटे पण अतिसुंदर. जणू कोलोराडोचे हृदयच. येथेही स्कीईंगची मजा लुटता येते. स्कीअर्सना हे ठिकाण स्वतःकडे खेचून घेते असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. इटलीतील अल्टा बाडिया हे डोमोलाईट पर्वतरांगात वसलेले ठिकाण हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. दूरवर पायी फिरण्याचा आनंद येथे मनमुराद लुटता येतो. नॉर्वेतील रेईन हे छोटोसे गाव म्हणजे लोफोटेन द्विपसमुहातील एक बेट आहे. हे मासेमारीचे बंदर असून तेथील लाल लाल लाकडी घरे गावाच्या सौंदर्यात अजून भर टाकतात.