मुंबई : सध्याच्या घडीला बाजारात रिलायन्स जिओच्या मोफत फोनची मोठी प्रतीक्षा आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, हे ऐकून अनेकांची निराशा झाली. पण जिओच्या या फोनमध्ये जिओ स्पेशल व्हॉट्सअॅप व्हर्जन देणार असल्याची माहिती आहे.
जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे स्पेशल एडीशन?
जिओ फोन हा सर्वात स्वस्त ४जी फोन असून हा फोन शून्य रुपये किंमतीत १५०० रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येईल. या फोनसाठी २४ ऑगस्टपासून बुकिंग सुरु होणार आहे. व्हॉट्सअॅप जिओ फोनमध्ये चालणार नाही, असे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आल्यामुळे हा फोन खरेदी करु इच्छिणाऱ्यांची मोठी निराशा झाली. मात्र ‘फॅक्टर डेली’च्या वृत्तानुसार जिओ या फोनसाठी एक स्पेशल व्हर्जन तयार करणार आहे.
जिओ आणि व्हॉट्सअॅप यांच्यात या मेसेंजरचे लाईट व्हर्जन तयार करण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरु असल्याचे या वृत्तात म्हटल्यामुळे दोन्ही कंपन्या जिओ फोनला सपोर्ट करणारे व्हर्जन तयार करतील, असा अंदाज लावला जात आहे. जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅप तयार करण्यासाठी काही तांत्रिक आव्हान आहेत. त्यामुळे जिओ फोनला सपोर्ट करणारे व्हर्जन तयार करावे लागेल, असे जिओच्या सूत्रांनी सांगितले आहे.