पावसाळ्यामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल?


पावसाळा म्हटले की सर्दी, खोकला, तापाच्या साथीबरोबरच डोळ्यांच्या आजाराची साथही हमखास येते. ओलसर, दमट हवा, जिकडे तिकडे साठलेली पाण्याची डबकी, एकंदर साफसफाईचा अभाव या कारणांमुळे डोळे येणे, रांजणवाडी येणे, डोळे सतत कोरडे पडणे किंवा डोळ्यांची आग होऊन डोळ्यांमधून सतत पाणी येत राहणे यांसारखे आजार उद्भवू लागतात. यापासून आपण बचाव कश्या प्रकारे करू शकतो या बद्दल थोडेसे..

इतरांनी वापरलेले टॉवेल किंवा हातरुमाल वापरणे आवर्जून टाळायला हवे. डोळ्यांचे आजार पसरण्याचे प्रमुख कारण अस्वच्छ टॉवेल किंवा हातरुमाल वापरणे हे आहे. तसेच डोळ्यांना हात लावण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जर आपण पावसामध्ये भिजलेले असाल, तर घरी आल्यानंतर आपला चेहरा , विशेषतः डोळे काळजीपूर्वक पाण्याने धुऊन स्वच्छ, मऊ कपड्याने पुसून कोरडे करावेत. या मुळे डोळ्यांमध्ये होणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळता येईल.

डोळे अचानक चुरचुरायला किंवा खाजायला लागल्यास डोळे चोळणे टाळावे. थंड पाण्याचे हबके डोळ्यांवर मारल्यास आराम मिळू शकतो. त्यानंतरही जर डोळ्यांची आग किंवा खाज कमी झाली नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अश्या वेळी स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत.

डोळे लाल होत असल्यास contact lenses वापरत असणाऱ्यांनी लेन्सेसचा वापर टाळावा. लेन्सेस वापरताना दर वेळी स्वच्छ धुऊन वापराव्यात. लेन्सेस डोळ्यांमध्ये घातलेल्या असताना वारा, धूळ किंवा पावसाच्या पाण्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. हात रुमाल वापरण्या ऐवजी डिस्पोजेबल टिश्यू वापरावेत. मात्र आपण वापरलेले टिश्यू व्यवस्थित डिस्पोज करावेत जेणेकरून इतरांना त्यापासून संसर्गाचा धोका उद्भवणार नाही.

Leave a Comment