प्रेमासाठी ठोकरली वडिलांची 19 अब्जाची संपत्ती


प्रेमासाठी आपल्या वडिलांच्या अब्जावधीच्या संपत्तीवर लाथ मारणाऱ्या एका मुलीची चर्चा सध्या मलेशियातील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अँजेलिन खू़ू असे या मुलीचे नाव आहे. मलेशियातील धनाड्य उद्योगपती खू़ू के पेंगयांची ती मुलगी आहे. ब्रिटिश लाईफस्टाईल व डिझाइन ब्रँड लॉरा अॅश्ले आणि लक्झरी हॉटेलांची कॉर्प्स ग्रुप या समुहांमध्ये त्यांची भागीदारी आहे. त्यांची एकूण संपत्ती 19 अब्ज रुपये (300 मिलियन डॉलर) असल्याचे फोर्ब्स या नियतकालिकाने म्हटले आहे.

के पेंग यांची मुलगी अँजेलिन फ्रांसिस खू़ू हिचे 2008 साली जेदीदाह फ्रांसिस या मुलावर प्रेम जडले. मात्र अँजेलिनचे वडील के पेंग यांना ते रूचले नाही. जेदीदाह हा डाटा सायंटीस्ट आहे. आपल्या या प्रेमाबद्दल अँजेलिनने नुकतेच डेली मेल या वृत्तपत्राला मुलाखत दिली.

जेदीदाह याच्याशी लग्न करण्याचा अर्थ होता वडिलांशी संबंध तोडणे आणि त्यासाठी ती 19 अब्जांची संपत्ती सोडण्यास तयार होती, असे तिने मुलाखतीत सांगितले.

“माझ्या वडिलांचा निर्णय चुकीचा होता, यावर माझा विश्वास होता. त्यामुळे मी योग्य निर्णय घेतला. पैसा तुमच्यातील नकारात्मक चरित्र समोर आणतो. माझ्या दृष्टीने त्यावर मात करणे खूप सोपे होते. मी त्या विषयी एकदाही विचार केला नाही,” असे अँजेलिनने सांगितले.

त्यानंतर 2012 साली आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचेही अँजेलिनने सांगितले. तिच्या मुलाखतीनंतर तिला अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. अनेकांनी तिच्यावर टीका केली तर अनेकांनी तिला पाठिंबा दिला.