आपल्या संस्कृतीमध्ये औषधींचे महत्व फार पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. इतकेच नाही तर या औषधींपासून नवनवीन औषधे आज ही तयार करून बाजारात आणली जात आहेत. अश्या या औषधींपैकी काही वनस्पती आपण अगदी घरच्या घरी लावून गरज भासेल तेव्हा उपयोगात आणू शकतो.
ह्या औषधी वनस्पती नेहमीच आपल्या घरी ठेवा..
तुळस : तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल तत्वे आहेत. तसेच या मध्ये अ,क , आणि के प्रथिने ही असून मँगनीज, लोह इत्यादी पोषक तत्वे ही आहेत. तुळशीच्या नियमित सेवनामुळे अपचन, भूक न लागणे, सर्दी, खोकला, यांसारख्या विकारांपासून मुक्ति मिळते.
पुदिना : पुदिना, ही दमट हवेत होणारी वनस्पती आहे. पुदिन्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी तो मोठ्या आणि जराश्या खोल कुंडीत लावावा. पुदिन्यामध्ये अन्न पचनास हितकारक तत्वे आहेत. उलट्या, पोटदुखी, छातीत दुखणे, गॅसेस, डोकेदुखी इत्यादी व्याधींवर पुदिना गुणकारी आहे.
ओरेगानो : या वनस्पतीचा उपयोग सर्दी, अंगदुखी, ताप, उलट्या, दातदुखी, आणि विशेष करून स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळेस होणाऱ्या वेदनांच्या शमनासाठी केला जातो.
पपईच्या झाडाची पाने : पपईच्या पानांचा रस ताप व त्यामुळे उद्भविणार्या अंगदुखीसाठी अतिशय गुणकारी आहे. विशेष करून डेंग्यू सारख्या रोगांमध्ये पपईच्या पानांचा रस सेवन केल्यास प्लेटलेट्सची संख्या स्थिर राहण्यास मदत मिळते. त्याचबरोबर हातापायांचे दुखणे ही या रसामुळे कमी होते. हा रस रोज दोन ते तीन चमचे, ताप उतरेपर्यंत घ्यावा.