गाडी चालवताना चालकास झोप लागू नये यासाठी नवी यंत्रणा..


गाडी चालवताना चालकाला झोप लागून अपघात झाल्याच्या घटना आपण अधूनमधून ऐकत असतो. या घटनानांना आळा घालण्यासाठी बेंगळूरू येथील PES विद्यापीठाच्या, अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी एक नवीन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे लांबवरचे प्रवास आता चालक आणि पर्यायाने प्रवासी यांकरिता कमी चिंतेचे होणार आहेत. या यंत्रणेद्वारे, गाडी चालवताना चालकास झोप येते आहे असे पाहिल्यानंतर व्हायब्रेशन, निरनिराळे आवाज यांद्वारे चालकास जागे ठेवण्याचे काम केले जाणार आहे. या यंत्र निर्मितीच्या प्रकल्पास राज्यसरकारची आर्थिक मदतही मिळाली आहे.

ही यंत्रणा “ फेस रीडिंग मेकॅनिझम “ च्या माध्यमातून काम करते. या यंत्रामध्ये एक कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा चालकाच्या चेहऱ्यावर केंद्रित केलेला असतो. हा कॅमेरा चालकाच्या डोळ्यांची हालचाल वा त्याने किती जांभया दिल्या याची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार अलर्ट पाठवतो. एखादी व्यक्ती साधारण दीड सेकंदामध्ये एकदा डोळ्यांची उघडझाप करत असते. त्या हिशोबाने जर चालकाचे डोळे दीड सेकंदापेक्षा जास्त मिटत असले तर त्याला झोप येते आहे हे ओळखून यंत्राद्वारे त्याला सावधान केले जाईल. तसेच चालकाने ठराविक वेळेमध्ये तीनपेक्षा जास्त जांभया दिल्यास यंत्रणा चालकास सावध करते.

चालकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव कॅमेरा टिपतो आणि तो डेटा एका सर्वरकडे पाठवला जातो. चालकास गाडी चालवताना झोप येते आहे असे लक्षात आल्यास यंत्राच्या द्वारे स्टीअरिंग व्हील मध्ये व्हायब्रेशन पाठवली जातात जेणेकरून चालाकाला झोपण्यापासून परावृत्त करता येऊ शकेल.

अश्या इतरही यंत्रणा बाजारात उपलब्ध असल्या तरी त्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडण्याजोगी नाही. मात्र या विद्यार्थांच्या द्वारे तयार केली गेलेली यंत्रणा अंदाजे दहा हजार रुपयांमध्ये ग्राहकांना मिळू शकणार आहे.

Leave a Comment