टायगर ऑफ सतनूर


कर्नाटकाचे ज्येष्ठ मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील छाप्यांचे प्रकरण आता चांगलेच तापायला लागले आहे कारण या छाप्यांवरून कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी या छाप्यांमागे सुडबुद्धी असल्याचा आरोप करायला सुरूवात केली आहे. गुजरातेतली राज्यसभेची निवडणूक हे या सार्‍या राजकारणामागचे कारण आहे. तिथे कॉंग्रेेसचे आमदार फुटायला सुरूवात झाली म्हणून त्यांना बंगळूर येथे आणून ठेवण्यात आले. या आमदारांची बडदास्त ठेवण्याचे काम डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आले आणि नेमके याच वेळी त्यांच्या मालमत्तांवर आयकर खात्याच छापे पडले. म्हणूनच कॉंग्रेसच्या नेत्यांना हे छापे हा सूडनाट्याचाच एक भाग असल्याचा आरोप करण्याची सोय झाली.

वास्तविक गुजरातेतल्या आमदारांची सरबराई आणि छापे यांचा काही संबंध नाही. गुजरातचे कॉंग्रेसचे आमदार बंगळूरमध्ये आणले गेले आणि एका दिवसांत एवढे छापे टाकण्याचे नियोजन केले गेले हे काही शक्य नाही. या छाप्यांची खरी सुरूवात २०१३ साली झाली आहे. डी. के. शिवकुमार हे देशातले सर्वात श्रीमंत राजकारणी आहेत. कारण त्यांनी आपल्याकडे २१५ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तत्पूर्वी झालेल्या २००८ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची मालमत्ता १६० कोटीच्या आसपास होती. ती २०१३ साली एकदम व वाढलेली दिसली तिथून त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झालेली आहे. तिच्यातून हे छापे पडले आहेत.

शिवकुमार हे राजकारणात धूमकेतूप्रमाणे उदयाला आलेले नेते आहेत. त्यांचे गाव बंगळूर जवळ असून गावाचे नाव सतनूर आहे. त्या भागात ते राजकारणात यशस्वी होण्यासाठी सगळे मार्ग अवलंबणारे पुढारी म्हणून नावाजले गेले असून त्यांना टायगर ऑफ सतनूर असे म्हटले जाते. त्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र कुमार स्वामी यांच्या विरोधात सातत्याने निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यात पराभव पत्करला आहे. पण १९८९ साली जनता दलाचे नेते पीजीआर शिंदिया यांचा पराभव करून ते निवडून आले आणि त्यामुळे ख्यातनाम झाले. एस. एम कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले आणि त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. असे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे येत असतानाच छाप्यांवरून संकटात आले आहे.

Leave a Comment