मुंबई – आता दूरसंचार नियामक प्राधिकरणानेही (ट्राय) रिलायन्स जिओच्या ४जी स्पीडवर शिक्कामोर्तब केले असून रिलायन्स जिओच्या इंटरनेट सेवेचा डाऊनलोड स्पीड इतर सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे ट्रायच्या जून महिन्यासाठीच्या अहवालात म्हटले आहे. ट्रायने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओच्या ४ जी सेवेचा डाऊनलोड स्पीड १८ मेगाबाईट पर सेकंद असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी एअरटेलचा डाऊनलोड स्पीड सर्वांत कमी म्हणजे अवघा ८.९१ मेगाबाईट पर सेकंद इतका असल्याचे दिसून आले. एअरटेलने एका खासगी फर्मने केलेल्या पाहणीच्या आधारे आमचा इंटरनेट स्पीड सर्वांत जास्त असल्याचा दावा केला होता.
रिलायन्स जिओचा ४ जी स्पीडच ‘लयभारी’
ट्रायने दिलेल्या यादीमध्ये व्होडाफोनचा नंबर दुसरा आहे. तरीही व्होडाफोन आणि रिलायन्स जिओ या दोन्हींच्या ४जी सेवेच्या डाऊनलोड स्पीडमधील तफावत तब्बल ६८ टक्क्यांवर आहे. रिलायन्स जिओचा स्पीड जून महिन्याच्या सुरुवातीला १९.१२ मेगाबाईट पर सेकंद इतका होता. तो महिनाअखेर कमी होत १८.६५ मेगाबाईट पर सेकंद एवढा झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
ट्राय मायस्पीड अॅप्लिकेशनच्या साह्याने रिअल टाईममध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड मोजते. ही आकडेवारी दर महिन्याला त्याच आधारावर जाहीर केली जाते. व्होडाफोन जून महिन्याच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यांच्या सेवेचा डाऊनलोड स्पीड ११.०७ मेगाबाईट पर सेकंद इतकाच असल्याचे म्हटले आहे.