हज यात्रेतून सौदीला भरभक्कम कमाई


जगभरातील लाखो मुस्लीमांना आयुष्यात किमान एकदा तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते व दरवर्षी लाखो मुस्लीम या यात्रेसाठी सौदीला भेट देतात. आकडेवारी सांगते गतवर्षी ८३ लाख भाविकांनी ही यात्रा केली. तरी सौदीने मुस्लीम वस्ती असलेल्या प्रत्येक देशाला ठराविक कोटा ठरवून दिला आहे व तेवढेच भाविक येथे येऊ शकतात. मात्र स्थानिक भाविकही येथे मोठ्या संख्येने येतात व वर्षातून एकदा भरणार्‍या या यात्रेतून सौदी सरकारचा खजिना चांगलाच भरतो.

गतवर्षी या यात्रेतून सौदी सरकारच्या खजिन्यात १२ अब्ज डॉलर्स म्हणजे ७६ हजार ५०० कोटी रूपयांची भर पडल्याचे समजते. शिवाय आलेल्या यात्रेकरूंनी येथे २३ अब्ज डॉलर्स खर्च केले. अर्थात हे सर्व उत्पन्न सरकारी जमा नसले तरी त्यातील कांही भाग सरकारी खजिन्यात जमा झाला. मक्का चेंबर ऑफ कॉमर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार बाहेर देशातून येणार्‍या भाविकांना या यात्रेसाठी साधारण ४६०० डॉलर्स म्हणजे ३ लाख रूपये खर्च येतो तर स्थानिकांसाठी हाच खर्च १५०० डॉलर्स म्हणजे १ लाख रूपयांपर्यंत असतो. या यात्रेसाठी इंडोनेशियाला सर्वाधिक कोटा आहे. त्यांचे २.२२००० नागरिक दरवर्षी ही यात्रा करू शकतात. पाकिस्तानसाठी व भारतासाठी ११ टक्के कोटा असून बांग्लादेशासाठी तो ८ टक्के आहे.

सौदीचे बहुतेक उत्पन्न कच्च्या तेलाच्या विक्रीतून होत असते. गेले काही दिवस हे उत्पन्न घटत चालल्याने सौदीवर आर्थिक संकट घोंघावू लागले आहे अशा वेळी धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देऊन त्यातून उत्पन्न वाढीचा विचार सरकार गंभीरपणे करत असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment