राजकारणातले वळसे


राजकारण हा सूडाचा प्रवास असतो का? तो डावपेचांचा आखाडा असतो का ? ते कट कारस्थाने करणारांचे आश्रयस्थान असते का? असे प्रश्‍न वारंवार विचारले जात असतात. मॅकिव्हली नावाच्या पाश्‍चात्त्य विचारवंताने राजकारणात हे सारे प्रकार चालणारच असे मानले होते. राजकारणात एक व्यक्ती दुसरीची सत्ता हस्तगत करीत असते तेव्हा तशी तो ते काम देवाची पूजा केल्याप्रमाणे भक्तिभावाने थोडेच करते ? त्यात लबाडी, फसवणूक असणारच असे मॅकिव्हली म्हणतो. महात्मा गांधी यांनी या सिद्धांताला पर्याय दिला. राजकारण हे शुद्ध भावनेने केले पाहिजे तरच त्या राजकारणातून होणारे साध्यही पवित्र राहील असे महात्माजींनी प्रतिपादन केले. कोणी काहीही म्हटले असले तरीही राजकारण काही आपला स्वभाव बदलत नाही. मग महात्मा गांधींचा गुजरात तरी त्याला अपवाद कसा असेल? तिथे आज राज्यसभेच्या एका जागेसाठी चाललेले राजकारण पाहिले म्हणजे याचे प्रत्यंतर येते. आजवर अशा एका पदासाठी एवढे राजकारण झाले नव्हते.

गुजरातेतून राज्यसभेच्या तीन जागांसाठी येत्या आठवडाभरात मतदान होणार आहे. यातल्या एका जागेवर सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहंमद पटेल हे सलग पाचव्यांदा उभे आहेत. आजवर गुजरातेत कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या ६० ते ६७ च्या दरम्यान रहात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदानावर अहंमद पटेल हे निवडून येत गेले. अहंमद पटेेल हे दिल्लीच्या राजकारणातले किंग मेकर आणि सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य आहेत. सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना गुळाचा गणपती बनवून दिल्लीतली सत्ता आपल्या हातात ठेवली होती पण एवढी मोठी सत्ता राबवण्याची कुवत त्यांच्यात नाही. त्यांच्या वतिने अहंमद पटेल हेच सत्ता राबवत होते. म्हणूनच कसलाही जनाधार नसताना त्यांना पाच टर्म राज्यसभा सदस्यत्व मिळत गेले. ते राबवताना त्यांनी गुजरातेत कसलाही हस्तक्षेप केला नाही असे काही सांगता येत नाही. ते सोनिया गांधी यांच्यामार्फत मंत्र्यांच्या खाते वाटपापासून ते आमदारांच्या उमेदवारीपर्यंत सगळ्या गोष्टीत आपले निर्णय राबवीत होते. आणीबाणीच्या काळात राजेन्द्र धवन, यशपाल कपूर असे काही आतल्या वर्तुळातले रासपुतीन अशीच कामे करून घेत असत. मग भाजपाचे प्रभावी नेते म्हणवल्या जाणार्‍या अमित शहा आणि नरेन्द्र मोदी यांना अहंमद पटेल यांचा कसलाही उपद्रव झाला नसेेल असे काही सांगता येत नाही.

अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते पण त्यांना बनावट चकमकीच्या खटल्यात गुंतवून त्यांचा एन्काउंटर करण्यात आला. या प्रकरणात अमित शहा यांना म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांनाच राज्यातून हद्दपार करण्यात आले. अशा प्रकरणात बनावट चकमक झाली असे मानले तरीही आजवर अशा प्रकरणात कोणत्याही राज्याच्या गृहमंत्र्याला हद्दपार करेपर्यंत मजल गेली नव्हती. असा हा अपमान अमित शहासारखा राजकारणी विसरेल हे कसे शक्य आहे ? त्यांनी आता अहंमद पटेल यांचा राज्यसभेतला प्रवेश रोखण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. अहंमद पटेल यांनी अमित शहा यांचा परास्त करण्याचा प्रयत्न करणे हे तर राजकारणाच्या स्वभावाला धरून आहेच पण आता अमित शहा यांनी त्यांच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी एवढे राजकारण करणे हेही राजकारणाच्या स्वभावाला धरूनच आहे. या एका जागेसाठी एवढा संघर्ष होत आहे कारण त्याच्यात गुुंतलेल्या दोन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यातल्या संघर्षाला २००४ ते २०१४ या दशकाची मोठी पार्श्‍वभूमी आहे. या निमित्ताने राजकारणातील व्यक्तीचा उदय आणि अस्त हे कसे होत असतात याचे मनोज्ञ दर्शन होत आहे.

अहमद पटेल यांनी अमित शहा यांना बरबाद करण्याचा प्रयत्न केला असेल तर तोही साहजिक आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून गुजरातेत कॉंग्रेसला सातत्याने पराभव पत्करावा लागत आहे. १९८५ साली तिथे अमरसिंह चौधरी यांचे कॉंग्रेसचे सरकार आले होते पण त्यांच्या हातून सत्ता जी निसटली ती पुन्हा कधी प्राप्त झालीच नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी गुजरातेच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जिवाची बाजी लावून आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचा विचार करून कॉंग्रेसचा प्रचार केला. परंतु त्यांच्या कोणत्याही प्रचाराला तिथल्या जनतेने कधी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता गुजरातेत नरेंद्र मोदी नाहीत आणि मोदींचा प्रभाव ओसरत चालला आहे, अशी कॉंग्रेसजनांची समजूत झाली आहे आणि म्हणूनच आता जर एखादा जोरदार झटका दिला तर गुजरात कॉंग्रेसचा २५ वर्षांचा वनवास संपू शकेल अशी आशा कॉंग्रेसजनांना लागली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांचा प्रभाव नसणे आणि भाजपाच्या प्रभावाला जोरदार धक्का देणारे पाटीदार आंदोलन यामुळे गुजरातेतील भारतीय जनता पार्टी अडचणीत आहे असेही त्यांना वाटते. म्हणूनच कॉंग्रेसच्या नेत्यांनी गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु त्यांच्या अशा आशा पल्लवीत होत असतानाच शंकरसिंग वाघेला यांनी जोरदार झटका दिला. हा सारा परिणाम राज्यसभेच्या एका निवडणुकीमध्ये दिसायला लागला आहे.

Leave a Comment