येथे अजूनही बनतात हँडमेड मालवाहू जहाजे


गुजराथच्या कच्छ मधील मांडवी बंदर हे आजही हाताने बनविलेल्या जहाजांसाठी जगभरात प्रसिद्ध असून गेली चारशे वर्षे येथे ही परंपरा अस्तित्वात आहे. जहाजे बनविण्याचे हे परंपरागत काम करण्यात खारवा जमातीचे लोक निष्णात आहेत. हे लोक फारसे शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे अभियांत्रिकीचे ज्ञान नाही तरीही कोणताही आराखडा अथवा डिझाईन तयार न करताही हे लोक प्रचंड मोठी मालवाहतुकीची लाकडी जहाजे तयार करतात. या जहाजांना डोस असे म्हटले जाते.

साल व बाभूळ झाडाच्या लाकडांचा त्यासाठी वापर केला जातो. मलेशिया, इंडोनेशिया, बर्मा येथून साल लाकूड आयात केले जाते व बाभुळीची झाडे या भागात खूप आहेत. ही जहाजे बनविणे अतिशय मेहनतीचे काम आहे. ४०० वर्षांपूर्वीच्या या कलेत आता थोडेफार बदल झाले आहेत. पूर्वी ४० टन क्षमतेची छोटी जहाजे बनविली जात होती आता २ हजार टन क्षमतेची जहाजे येथे बनतात. मात्र आजकाल लाकडी जहाजांचा वापर जगभरात कमी झाला असून त्याची जागा पोलादी जहाजांनी घेतली आहे.

लाकडी जहाज बनविण्याची प्रक्रिया मोठी आहे. प्रथम फ्रेम तयार केली जाते. त्याचा आकार जंगलातील मैदानांइतका असतो. हे सर्व काम हाताने केले जाते. त्यासाठी कोणतेही मशीन वापरले जात नाही.१५८० सालात मांडवी महाराजा खेंगजी यांनी हा व्यवसाय स्थापन केला. मांडवी हे तेव्हा पश्चम आशिया व अफ्रिकेसाठी प्रवेशद्वार होते. येथून जगभरात उंट व मसाल्यांचा व्यापर केला जात असे.

Leave a Comment