टोरंटो- छोट्या जगाचा अनुभव देणारे शहर


अमेरिका, ब्रिटनसारखे देश परदेशींना अापल्या देशात न येऊ देण्याबद्दल प्रयत्नशील राहिले असताना अमेरिकेचा शेजारी कॅनडा मात्र दोन्ही बाहू पसरवून परदेशींनी आपल्या देशांत यावे, राहावे यासाठी स्वागत करताना दिसतो आहे. कॅनडातील एक शहर टोरंटो येथे तर जगातील बहुतेक देशांच्या नागरिकांची मांदियाळीच जमली असून या शहराला मिनी दुनिया असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या शहराची लोकसंख्या दरवर्षी १ लाखाने वाढते आहे व त्यात बाहेरून येणारे अधिक संख्येने आहेत. त्यामुळे विविध संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ यांचा एक सुंदर मिलाफ येथे झाला आहे. या शहरात १४० बोलीभाषा बोलल्या जातात असेही समजते.

येथे मिनी इंडिया आहे, लिटल इटली, पोर्तुगाल व्हिलेज, चायना टाऊनही आहे. त्याच्याजवळच अफ्रिकन देश इथिओपियाचे खाद्यपदार्थ दिसतात. येथे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका व लॅटीन अमेरिकेचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परदेशातून येथे येणार्‍यांना प्रगतीच्या खूप संधीही आहेत. येथे तंत्रज्ञान प्रगत आहे त्यामुळे सर्व अत्याधुनिक सुविधाही येथे उपलब्ध आहेत.


येथे समुद्र नाही पण सुंदर बीच आहेत. हे किनारे ग्रेट लेक्सचे आहेत. येथील सरोवरे स्वच्छ आहेत. येथे दरवर्षी जॅझ फेस्टीव्हल भरतो. अनेक बागा, सुंदर पायवाटा, प्रचंड झाडी यांमुळे मोठ्या शहरातल्या सुविधांबरोबरच येथे छोट्या शहराच्या राहणीमानाचा आनंद लुटता येतो. हे स्वच्छ, सुंदर शहर सुरक्षित मानले जाते. चायना टाऊनमधला केसिग्टन बाजार सर्वात लोकप्रिय आहे. येथे स्थानिक वस्तूंबरोबरच आंतरराष्ट्रीय ब्रँडही उपलब्ध आहेत. कॅफे, दुकाने, आर्टगॅलरींनी या परिसर गजबजला आहे.

या शहरापासून जवळ असलेले सिटी आयलंड पर्यटकांचे विशेष आवडते आहेच पण येथून १२८ किमी वर जगप्रसिद्ध नायग्रा धबधबा आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील या धबधब्यापैक्षा त्याचा कॅनडातील भाग अधिक सुंदर आहे. या भागात खूप द्राक्ष बागा आहेत. स्की रिझॉर्टचा आनंदही येथे लुटता येतो.

Leave a Comment