आंब्यांइतकीच आंब्याची पानेही गुणकारी


उन्हाळा आणि आंबे यांचे समीकरण अतूट आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की कैर्‍या जागोजाग दिसायला लागतात व उन्हाळा जसा तापेल तसा आंब्याचा स्वादही दरवळायला लागतो. आंबा हे खास उन्हाळी फळ त्याची गोडी, स्वाद यामुळे सर्वांचे आवडते आहेच पण ते आरोग्यासाठीही अतिशय चांगले आहे. आंब्याचे गुण आपल्या सर्वांना माहिती असतात पण अनेकांना हे माहिती नाही की आंब्याची पानेही अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे अनेक व्याधींवर घरच्याघरी उपचार करता येतात.

आंब्याची नवी पालवी लाल पोपटी असते तर ही पाने जून झाली की गडद हिरव्या रंगाची होतात. आपल्याकडे शुभकार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे. असे सांगतात की या पानांच्या टोकात सी, बी व ए व्हिटॅमिन असते व त्यात अन्य पोषणमूल्येही आहेत. अँटी ऑक्सिडंट म्हणूनही ही पाने उपयुक्त असून ती पाण्यात उकळून अथवा चूर्ण स्वरूपात वापरता येतात.

डायबेटिस नियंत्रण- आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात शिवाय अॅजिओपथी, रेटिनोपथी मध्ये ती गुणकारी आहेत. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी तसेच व्हेरिकोज व्हेन्स मध्येही ही पाने उपयोगी आहेत.


अस्वस्थता- हायपर अँग्झायटीमुळे आलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात.

सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी, ब्राँकायटीस, अस्थमा यावर पानांचा पाण्यात उकळवून केलेला काढा घेतल्याने बरे वाटते. त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो. त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते. अतिसार अथवा हगवण झाल्यास अथवा शौचातून रक्त पडत असल्यास सावलीत वाळविलेली पाने पावडर करून दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याबरोबर घ्यावी. कानदुखीचा त्रास होत असेल तर पानांचा रस काढून चमचाभर रस कानात थेंबथेंब टाकत रहावा. कानात घालताना हा रस थोडा कोमट करून घालावा.

भाजल्याने झालेल्या जखमा आंब्याच्या पानांची जाळून राख करून ती जखमांवर लावल्याने लवकर भरून येतात. या राखेमुळे त्वचा गार राहते. उचक्या लागत असल्यास अथवा घशाचा त्रास होत असल्यास ही पाने जाळून त्याचा धूर श्यासमार्गे आत ओढावा. पोट स्वच्छ व हलके राहण्यासाठी एका झाकणाच्या डब्यात पाने पाण्यात टाकून झाकण लावावे व रात्रभर ते तसेच ठेवून सकाळी गाळून हे पाणी अनोशा पोटी प्यावे. हा उपचार नियमाने केल्यास पोटाचे त्रास होत नाहीत.