‘एलियन्स’ला रोखण्यासाठी ‘नासा’ कडून सव्वा कोटींचे पॅकेज


वॉशिंग्टन – कोणताही देश संरक्षणावर बारकाईने लक्ष तर देतोच शिवाय त्यासाठी यंत्रणेवरही मोठा खर्च करतो ;पण पृथ्वीचे रक्षण कसे आणि कोण करणार? विशेषतः परग्रहावरील एलियन्सपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी नासाने आता कंबर कसली आहे त्यासाठी धाडसी अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे, विशेष म्हणजे ८० लाखांपासून सव्वा कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले आहे.

अमेरिकन सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरही या पदाची माहिती देण्यात आली आहे. ‘प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर’ असं या पदाला नाव देण्यात आलं आहे. या पदासाठी तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेतले जाणार आहे.मानवाकडून पृथ्वी आणि चंद्र यांच्या व्यतिरिक्त अंतराळातील इतर कोणत्याही ग्रहाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरकडे असणार आहे. तसेच एलियन्स पृथ्वीच्या कक्षेत येण्यापासून रोखणं, अंतराळातील नासाच्या उपग्रहांचे संरक्षण करणे, अंतराळात जैविक कचरा पसरू देऊ नये ही जबाबदारी प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरला पार पाडावी लागणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने इंजिनीयरिंगमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतलेले असावे आणि त्या व्यक्तीला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अमेरिकेतील अंतराळ संस्था नासानं पृथ्वीला एलियन्सचा धोका असल्याचा अंदाज वर्तविला आहे या पार्श्वभूमीवर एलियन्सपासून संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याने नासाने अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी जगभरातून अर्ज मागवले आहेत .

Leave a Comment