नवी दिल्ली : रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरून जर तुम्ही नियमित तात्काळ बुकींग करत असाल तर रेल्वेने आणलेल्या नव्या योजनेनुसार तात्काळ तिकीटाचे पैसे रेल्वे प्रवासी नंतरही देऊ शकतात. म्हणजे तात्काळ तिकीट बुक करताना तुम्हाला पैसे देण्याची गरज नसणार, ते पैसे तुम्ही नंतरही देऊ शकता. ही सेवा आतापर्यंत केवळ सामान्य तिकीटांच्या बुकींगसाठी उपलब्ध होती.
आता पैसे न देता बुक करू शकता रेल्वेचे तात्काळ तिकीट
तात्काळ तिकीटांची ऑनलाईन बुकींग सेवा सोपी करण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने ‘पे-ऑन डिलिवरी’ सेवा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटांच्या होम डिलिव्हरीचा पर्यायही मिळणार आहे. तसेच ते तिकीट बुकींग केल्यानंतर कॅश, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकतील. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत आयआरसीटीसीने दावा केला आहे की, पेमेंटसाठी लागणारा वेळ नव्या सेवेमुळे बुकींग दरम्यान वाचणार असून यूजरला कन्फर्म्ड तिकीट मिळण्याची संधी वाढणार आहे. रोज साधारण एक लाख ३० हजार तिकीटे आयआरसीटीसीवरून बुक केली जातात. यातील बरीच तिकीटे तात्काळ सेवा सुरू होताच काही मिनिटांमध्येच बुक होतात. आयआरसीटीसी द्वारे आतापर्यंत यूजर्स त्यांचे तिकीट कन्फर्म करण्याआधी स्टॅंडर्ड ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पैसे देत होते. त्यामुळे यात बराच वेळ जात होता. अनेकांना या कारणामुळे कन्फर्म तिकीट मिळत नव्हते. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सेवेमुळे ही पद्धत सोपी होणार आहे. ऑनलाईन पेमेंट करण्याचा वेळ वाचणार आहे.