संकटांचा ससेमिरा


बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यांचेच नुकसान झाले असे आपण मानतो पण प्रत्यक्षात कॉंग्रेसचेही नुकसान झाले आहे. या नुकसानी पाठोपाठ आता गुजरात आणि कर्नाटक याही दोन राज्यांत कॉंग्रेसवर संकटे कोसळत आहेत. गुजरातेत कॉंग्रेसचे ५८ आमदार होते. त्यातले आता ४४ आमदार कॉंग्रेसमध्ये उरले आहेत. तेही निसटले तर सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहंमद पटेल यांचे गुजरातेतून राज्यसभेवर निवडून जाणे अडचणीत येईल म्हणून पक्षाने त्यांना एकत्र करून कर्नाटकात एका रिसोर्ट मध्ये नेऊन ठेवले आहे. तिथे त्यांच्यावर पक्षाची कडक नजर आहे आणि एकाही आमदाराला या रिसोर्टमधून बाहेर पडू दिले जात नाही. त्यामुुळे हे आमदारही वैतागले आहेत.

अशा रितीने त्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी ठेवले आहे ते विश्रांतीचे ठिकाणही अडचणीत सापडले असून त्याच्या परवानगीचा वाद नेमका आताच पुढे आले आहे. कर्नाटक सरकारनेच या रिसोर्टच्या मालकाला नोटीस पाठवली असून दंड म्हणून ९१४ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. या ठिकाणी आमदारांचा बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी तिथले कॉंग्रेसपक्षीय ऊर्जा मंत्री शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आले आहे. काल म्हणजे बुधवारी सकाळी त्यांच्याही घरावर आयकर खात्याच्या अधिकार्‍यांची धाड पडली असून त्यांच्या घरातून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या आमदारांनी फुटून भाजपात जाऊ नये यासाठी त्यांना देण्याकरिता ही रक्कम तिथे आणण्यात आली होती.

शिवकुमार हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडे कर्नाटकाचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. पण त्यांचीच अशी कोडी झाल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना काहीही करता येईना म्हणून त्यांनी राज्यसभेत गोंधळ घातला पण कॉंग्रेसच्या नेत्यांचे हेही हत्यार आता बोथट झाले आहे. त्याला आता सरकार काही दाद देत नाही. म्हणून बंगळूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयकर खात्याच्या कार्यालयावर दगडफेक केली. आता चारही बाजूने कोंडी झालेल्या कॉंग्रेस पक्षाला यापेक्षा वेगळा कोणताही वैध मार्ग उपलब्ध नाही. या सार्‍या प्रकाराबाबत सोनिया गांधी तर चकार शब्दही बोलत नाहीत. आता शिवकुमार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातेतले कॉंग्रेेस आमदार फोडण्यासाठी भाजपाने पैशांचा वापर केला असा आरोप कॉंग्रेसचे नेते करीत आहेत पण हा आरोप सिद्ध करीत नाहीत. स्वत: मात्र अशाच आरोपात सापडले आहेत. संकटांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे.

Leave a Comment