झाडांचे खतपाणी कसे बघाल?


आपल्या फुलझाडांच्या किंवा फळझाडांच्या योग्य वाढीसाठी झाडांना योग्य प्रमाणात खते घालणे आवश्यक असते. झाडांना खतांचे पोषण योग्य मिळत असेल तर फुले, फळे मुबलक प्रमाणात येतील. पण केवळ खते वापरून झाडांची वाढ चांगली होते असे म्हणणे चुकीचे ठरेल. मुळात जमिनीचा कस किंवा जमीन किती सुपीक आहे या वर झाडांची वाढ मुख्यत्वे अवलंबून असते. आपण वापरत असलेली खते झाडांच्या वाढीला हातभार लावतात. पुष्कळदा झाडे सुकलेली आपण पाहतो. याचे कारण खतांचा अतिरिक्त वापर असू शकते. खते हे झाडांचे अन्न नाही, तर आपले अन्न तयार करण्याकरिता झाडांना मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे खते अतिरिक्त प्रमाणात वापरल्यास मातीमध्ये salts चे प्रमाण वाढून ते झाडांना अपायकारक ठरू शकते.त्यामुळे खते घालताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

खते कशी वापरावीत? : खते सेंद्रिय किंवा रासायनिक पद्धतीची असतात. रासायनिक खते वापरायची झाल्यास ती कशी वापरावीत याबद्दलच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. ही खते जास्त प्रमाणात वापरली गेल्यास झाडे करपून जाण्याचा धोका उद्भवू शकतो. तसेच रासायनिक खते पाण्यामध्ये मिसळून वापरायची असल्यास ते मिश्रण दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेऊ नयेत. कडक उन्हाच्या वेळी ही खते झाडांना घालणे टाळावे, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी खते घालावी. खत घातल्यानंतर झाडांना पाणी घालावे.

सेंद्रिय खते कोरड्या मातीमध्ये मिसळून घालावीत आणि त्यानंतर झाडांना पाणी घालावे. सेंद्रिय खते रासायनिक खतांइतकीच पोषक असली तरी यांच्या वापरा मुळे झाडे करपण्याचा धोका संभवत नाही. सेंद्रिय खतांच्या माध्यमातून झाडांना आवश्यक प्रथिने, अमिनो अॅसिड्स तसेच इतर पोषक द्रव्ये पुरवली जातात.

जर झाडे कुंड्यांमध्ये लावलेली असतील तर साधारणपणे महिन्यातून एकदा खत घालवे. जर झाडे जमिनीत लावलेली असतील तर दर दोन ते तीन महिन्यात खत घालावे.