जादूटोणा, भूतप्रेत, आत्मा असल्या गोष्टींचा विषय निघाला की अंधश्रद्धा, त्यावरची टीका, मागास देश यांची चर्चाही सुरू होते. भारत व बहुसंख्य आशियाई तसेच अफ्रिकी देशांतील असल्या प्रकारांवर हिरीरीने मते मांडली जातात. मात्र विज्ञाननिष्ठ समजल्या जाणार्या पाश्चिमात्य देशांतही आता या व्यवसायाची जादू पसरू लागल्याचे दिसून येत आहे. सर्व जगावर व्यावसायिक मंदीचे सावट असतानाही हा व्यवसाय फ्रांन्स,ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशांत चांगलाच प्रगती करत असल्याचे आकडेवारी सांगते.
युरोपात जादूटोणा, मांत्रिक व्यवसाय तेजीत
मेक्सिकोतील संघटीत गुन्हेगारी, आर्थिक सामाजिक प्रश्नांनी घेरलेले ब्रिटन, व दहशतवादी हल्ल्यांनी हैराण झालेला फ्रान्स हे देश या सर्व कटकटींमागे अतृप्त आत्मे, भूतप्रेते असावीत अशा शंकेने ग्रासले गेले आहेत व या भूतप्रेतांवर तसेच वाईट शक्तींवर ताबा मिळविण्यासाठी असले उपाय करणार्या हिलर्सना त्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. मनाप्रमाणे यशप्राप्ती, आत्मा शुद्धीकरण, वाईट शक्तींवर काबू, व्यवसायात बरकत अशा अनेक कारणांनी लोक हिलर्स, मिडीयम्स( आत्मांशी संवाद साधणारे लोक),कॅबॅलिस्ट यांच्या भरमसाठ फिया भरण्याची तयारी दाखवित आहेत.
मेक्सिकोत मनपसंत जोडीदार मिळविणे, व्यवसायात बरकत यासाठी मदत करणारे हे हिलर्स २० हजार रूपयांपर्यंत चार्ज आकारत आहेत. यश, वाईट शक्तींवर काबू, आत्मा शुद्धीकरण यासाठी फ्रान्सचे नागरिक ११ ते ४० हजार रूपये मोजत आहेत तर ब्रिटनमध्ये हाच दर ३० ते ६० हजारांदरम्यान आहे. युरोपात बाहेरून जाणारे नागरिक तेथील धार्मिक रितीरिवाजांचा हिस्सा बनू शकत नाहीत. अशावेळी ते खासगी सेवा देणार्यांकडे जातात. फ्रान्समध्ये २०१५ पासून दहशतवादी हल्ले वाढत चालल्याने हा व्यवसाय तेजीत आला आहे. हे हिलर्स, मिडीयम्स त्यासाठी आधुनिक तंत्रांची मदत घेत असून त्यांची फेसबुक ट्वीटर पेज आहेत. साईटच्या माध्यमातून ते बुकींग घेतात.
युरोपात हिलर्सची प्राप्ती महिना ९ लाख रूपयांच्या घरात गेली आहे. पाच मिनिटांच्या फोनवरूनच्या सल्लयासाठी २ ते पाच हजार रूपये आकारले जातात. हे हिलर्स दरदिवशी १५-१५ तास काम करत असल्याचेही दिसून आले आहे.