ये रे ये रे पावसा ..


पावसाळा म्हटले की डोळ्यासमोर एक ठराविक चित्र उभे राहते. पण या चित्राला देखील दोन बाजू आहेत. एकीकडे थंडगार वारा, हिरवागार शालू नेसलेला निसर्ग, वरचेवर येणाऱ्या पावसाच्या सरी, मुद्दाम आयोजिलेल्या पावसाळी सहली, तर चित्राच्या दुसऱ्या बाजूला ट्रॅफिक जॅम, रस्त्यारस्त्यांवरून आढळणारे खड्डे आणि त्यातून स्वतःला सावरण्याची कसरत करत चालेले वाहनचालक आणि पादचारी असे नेहमी दृष्टीस पडत असते. अचानक आलेल्या पावसाच्या सरीने घराबाहेर पडलेल्या मंडळींची कशी त्रेधा उडते हे आपण सगळ्यांनीच पहिले आहे, अनुभवले आहे. अश्या वेळी हातातल्या सामानाबरोबर कधी कधी आपला मोबाईल फोन देखील भिजून चिंब होऊन बंद पडतो. अश्या वेळी फोन सुरु होत करायचा प्रयत्न न करता तांदुळाच्या डब्यामध्ये घालून ठेवावा. त्यामुळे फोने मधले पाणी किंवा आर्द्रता तांदुळात शोषली जाऊन फोन कोरडा होण्यास मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर पडताना आपल्याजवळची महत्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे, मोबाईल फोन, पैसे इत्यादी वस्तू लहान लहान प्लास्टिक च्या बॅग्स मध्ये न्याव्यात.

पावसात भिजल्यामुळे किंवा थंड हवेमुळे सर्दी, खोकला, ताप हे पाहुणे आवर्जून प्रत्येकाच्या घरी मुक्कामाला येतच असतात. रोज गरम पाण्यामधून आल्याचा रस, लिंबाचा रस आणि मध घेतल्यास या आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळेल.

पावसाळ्यामध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घराच्या किंवा ऑफिसच्या खिडक्यांमध्ये लिंबू अर्धे कापून त्यात दोन ते तीन लवंगा खोवून ठेवाव्या. त्यामुळे माशांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये कपड्यांच्या कपाटांमध्ये एक प्रकारचा ओलसर वास येऊ लागतो. हे टाळण्याकरिता एका रुमालामध्ये थोड्या लवंगा बांधून कपाटामध्ये ठेवाव्या. कपाटामध्ये नॅप्थालीन च्या गोळ्या ठेवल्याने ही कपाटामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्गंधी टाळता येऊ शकते.

पावसासामध्ये भिजल्याने लेदर किंवा सूएड चे शूज किंवा सँडल्स खराब होऊ नये या करिता त्यावर मेणबात्तीचे मेण चोळून ठेवावे. त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून शूज चा बचाव करणे शक्य होईल.

Leave a Comment