कॉंग्रेसचा प्रादेशिक वाद


देशाच्या राजकारणामध्ये कॉंग्रेस पक्षाला सगळीकडेच पराभवाला तोंड द्यावे लागत आहे आणि अशा वातावरणातच कॉंग्रेसच्या हाती असलेल्या कर्नाटकाला विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. पंजाबमध्ये विजय मिळवून कॉंग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांच्या आशा वाढवल्या आहेत आणि कर्नाटकात विजय मिळवू शकतो असे चित्र निर्माण करायला सुरूवात केली आहे. निदान आज तरी कर्नाटकाचे कॉंग्रेस पक्षीय मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांनी नवी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणायला सुरूवात केली आहे. सिध्दरामैय्या तसे कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी कर्नाटकात प्रादेशिक भावनेला बळकटी देऊन निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू केली आहे.

बेंगळुरुमधील मेट्रो रेल्वेच्या स्थानकांचे फलक हिंदीत रंगवण्यात आले होते. ते सिध्दरामैय्या यांनी हटवायला लावले आहेत. शिवाय जे लोक बाहेरून येऊन कर्नाटकात राहतात त्यांनी कर्नाटकाची संस्कृती आत्मसात केली पाहिजे असा त्यांना इशारा दिला आहे. ही भूमिका अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पातळीवर जाणारी आहे. कारण त्यातून कन्नड भाषिकांचा अहंकार सुखावण्याची शक्यता आहे. खरे म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांनी कर्नाटकाची संस्कृती आत्मसात केली आहे की नाही हे बघणार कसे? आणि ती आत्मसात न करणार्‍यांना शिक्षा करण्याची काही तरतूद सिध्दरामैय्या यांनी केलेली आहे का? तशी करता येतच नाही. मात्र भावनिक पातळीवर प्रादेशिक वाद पेटवून आपली राजकीय पोळी नक्कीच भाजून घेता येते.

कर्नाटकात अभियांत्रिकी महाविद्यालये मोठ्या संख्येने आहेत आणि त्या महाविद्यालयांमध्ये परराज्यातले अनेक विद्यार्थी येऊन शिकत असतात. यापुढे या महाविद्यालयातील सगळ्या जागा केवळ कन्नड भाषिकांनाच आरक्षित असाव्यात अशी एक मागणी पुढे आली आहे आणि तिला सिध्दरामैय्या यांनी मूकसंमती दिली आहे. शिवाय कर्नाटकाचा वेगळा ध्वज असावा अशा मागणीचीही एक टूम सिध्दरामैय्या यांनी काढलेली आहे. एकंदरीत त्यांचा सारा रोख प्रादेशिक भावना भडकवण्यावर आहे. कर्नाटकामध्ये आणि त्यातल्या त्यात उत्तर कर्नाटकात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे. त्या लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचे स्थान दिले जावे आणि आपण ते देण्यासाठी प्रयत्न करू असेही सिध्दरामैय्या यांनी घोषित केले असून भाजपाची पंचाईत केली आहे. कारण लिंगायत समाज हा भाजपाच्या मागे उभा राहत असतो आणि आता हा भाजपाचा समर्थक वर्ग हिंदुत्वाला प्राधान्य देणार की लिंगायत धर्माला प्राधान्य देणार असा वैचारिक पेच निर्माण झाला आहे.

Leave a Comment