मोदींना तोड नाही


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीशी पुन्हा एकदा युती करून मुख्यमंत्रीपद प्राप्त केले आहे आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असे राजकीय भाकीत वर्तवले आहे. नितीशकुमार यांनी वर्तवलेले हे भविष्य हे ज्योतिष शास्त्राच्या आधारे वर्तवलेले नाही तर तो त्यांचा राजकीय अंदाज आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून येण्याच्या स्थितीत आहेत ही गोष्ट कोणाला आवडो की न आवडो परंतु ती खरी आहे. कारण त्यांच्या विरोधकांनी नरेंद्र मोदींचा पर्याय म्हणून ज्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता ते नितीशकुमारच मोदींना शरण गेलेले आहेत. महागठबंधन तयार करून मोदींना पर्याय द्यायचा होता परंतु या गठबंधनातील एकेका घटक पक्षाची स्थिती पाहिली असता नितीशकुमार यांना त्याचे भवितव्य काही दिसेना. त्यामुळे त्यांनी मोदींना पर्यायी नेता म्हणून उभे राहण्याचा नाद सोडून दिला आणि आपल्या हातात आहे ते बिहारचे मुख्यमंत्रीपद सुखाने उपभोगता यावे याची खात्री करून घेत भाजपाशी जवळीक केली.

नितीशकुमार यांच्या रूपाने मोदींना पर्याय उभा करून २०१९ च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याची स्वप्ने बघणारे सारे विरोधक आता नितीशकुमार यांच्या नावाने बोटे मोडायला लागले आहेत आणि नितीशकुमार हे कसे बेईमान, खोटारडे आणि नीतीभ्रष्ट आहेत हे दाखवत त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वहात आहेत. मात्र त्या लाखोलीत तथ्य नाही. नितीशकुमार यांनी आपला स्वार्थ आणि सोय पाहिली आहे. पंतप्रधान होण्याचे आपले स्वप्न हे काही वास्तव नाही तेव्हा निमूटपणे भाजपाप्रणित रालो आघाडीत जाऊन उपपंतप्रधानपद तरी पदरात पडते का हे बघावे असा त्यांचा व्यवहारी हिशोब आहे. २०१९ साली काय होईल हे नक्की सांगता येत नाही परंतु भाजपाचे चाणक्य म्हणवणार्‍या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करून उत्तर भारतातले एक मोठे राज्य तरी आपल्या खिशात टाकलेले आहे. देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना मोठे महत्त्व आहे. उत्तर प्रदेशात भाजपाने तर वादळच आणलेले आहे. परंतु हे वादळ लालू आणि नितीश यांनी बिहारमध्ये अडवले होते. त्या वादळाच्या आड आलेला हा महागठबंधनाचा अडथळा मोदींनी मोठ्या चातुर्याने दूर केला आहे. त्यात नितीशकुमार यांचाही फायदा झाला असला तरी या नंतर त्यांना भाजपाशीच युती करून राजकारण करावे लागणार आहे. कारण त्यांच्यासाठी राजद, कॉंग्रेस यांचे दरवाजे आता बंद झालेले आहेत.

नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना शब्द राखून ठेवलेले नाहीत. परंतु त्यांच्या या प्रशंसेने भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. २०१३ साली म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागण्याच्या एक वर्ष आधी नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे संकेत मिळायला लागले होते. त्यावेळी बिहारमध्ये नितीशकुमार आणि भाजपाला यांच्या युतीचे सरकार सुखाने नांदत होते. मात्र नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातला उदय हा देशाच्या सेक्युलॅरिझमला मोठा धोका आहे असे नितीशकुमार यांना वाटायला लागले. त्यांनी भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करू नये असे आडून आडून सुचवले. परंतु भाजपाश्रेष्ठी आणि संघ परिवार मोदींच्या नावावर आग्रही होता. नितीशकुमार यांनी त्यांना केलेला विरोध हा सेक्युलॅरिझम विरुध्द हिंदुत्ववाद अशा वैचारिक स्वरूपाचा होता. नितीशकुमार हे नरेंद्र मोदी यांना जातीयवादाचे प्रतिक मानत होते. परंतु गेल्या तीन वर्षातल्या अनुभवावरून नितीशकुमार यांची दृष्टी बदललेली दिसते. ते आता मोदींना जातीयवादी मानायला तयार नाहीत.

नरेंद्र मोदींना जातीयवादी ठरवून, स्वतःला सेक्युलर म्हणवून मुस्लिमांच्या अनुनयाचे राजकारण करणारे प्रभावी नेते आता कोणी राहिलेले नाहीत आणि नरेंद्र मोदी यांनीही अतीशय समतोलपणे वागवून तसेच ‘राजधर्म’ निभावून आपल्यावरचा जातीयवादाचा डाग पुसण्याचा प्रभावी प्रयत्न केलेला आहे. देशात कोठेही नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुस्लीम समाज जाणीवपूर्वक एकवटला आहे असे दिसत नाही. उलट मुस्लीम समाजातील काही गट नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहत आहेत. मोदींनी गेल्या तीन वर्षात मुस्लिमांचा अनुनय करण्याचा कोठेही प्रयत्न केला नाही आणि त्यांचा दुस्वाससुध्दा केलेला नाही. आपल्यासाठी सगळे नागरिक सारखे आहेत. त्यात मुस्लिमांचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. हे तत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना होणारा मुस्लीम समाजाचा टोकाचा आणि धारदार विरोध आता बराचसा बोथट झाला आहे. उत्तर प्रदेशात मुस्लीम समाजाचे प्रभावी राजकारण करणारे मुलायमसिंग यादव हेसुध्दा हळूहळू नरेंद्र मोदींशी कानगोष्टी करायला लागले आहेत. शिवाय तिहेरी तलाकाच्या प्रश्‍नावर मुस्लिमांच्या धार्मिक भावना न दुखावता तोडगा काढण्यास नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मुस्लीम महिला माेदींचा उदो उदो करत आहेत. त्यातच नितीशकुमार यांनी मोदींची प्रशंसा केल्यामुळे देशाच्या राजकारणातील जातीयवाद विरुध्द सेक्युलॅरिझम हा वाद संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Leave a Comment