इको फ्रेंडली पेन “ एन्ट्री “


केरळ येथील लक्ष्मी मेनन यांनी “ एन्ट्री “ नावाचे पेन विकसित केले आहे. आपण नेहमी वापरत असलेल्या बॉल पॉईंट पेंसाठी “ एन्ट्री “ हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. या पेनची विशेषता अशी की ह्या पेन मधील शाई संपल्यानंतर हे पेन टाकून न देता एखाद्या कुंडी मध्ये लावल्यास त्या पासून चक्क एक नवे रोप जन्माला येते. “ एन्ट्री “ हे पेन प्रिंटींग प्रेस मधून वाया गेलेल्या कागदापासून बनवले गेले आहे. या प्रत्येक पेनच्या टोकाशी झाडाच्या बिया घातल्या गेल्या आहेत. या बिया “ अगस्त्य “ या झाडाच्या असून आयुर्वेदामध्ये अगस्त्य या झाडाचे गुणविशेष सांगितले गेले आहेत. या एका पेनाच्या निर्मितीमुळे पर्यावरणासाठी कल्याणकारी अनेक हेतू साध्य होणार आहेत. एक तर वाया जाणारा कागद या पेनाच्या निर्मिती साठी रिसायकल केला जातो , दुसरे म्हणजे प्लास्टिकचे पेन निकामी झाल्यावर फेकून दिले जाते , आणि त्यामुळे साठत गेलेले प्लास्टिक पर्यावरणाकरिता हानिकारक आहे. प्लास्टिक मुळे होणारे हे नुकसान “ एन्ट्री “ च्या निर्मितीमुळे टाळता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक पेनामुळे एक नवीन झाड लावता येणार आहे. लक्ष्मी मेनन यांची “ प्युअर लिव्हिंग “ नावाची संस्था हे पेन निर्मितीचे कार्य करीत आहे. या कामी लक्ष्मी यांनी आर्थिक दृष्ट्या गरजू तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग महिलांची मदत घेत त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या पेनची किंमत अवघी १२ रुपये इतकीच असली तरी हे पेन पर्यावरणासाठी वरदान ठरणार आहे हे मात्र नक्की.

Leave a Comment