पणजी: पिकनिकसाठी ड्रीम डेस्टिनेशन असलेले आणि पर्यटनासाठी हॉट डेस्टिनेशन असलेल्या गोव्यामध्ये आता मद्यपान करणाऱ्यांना बंधने पाळावीच लागणार आहेत. विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर मद्यपानास अटकाव करण्यात येणार आहे. जो ही बंधने पाळणार नाही त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. वेळप्रसंगी तुरुंगाची हवाही खावी लागणार आहे.
गोव्यात मद्यपान करा ;पण जरा जपूनच !
भारतामधील इतर राज्यांच्या तुलनेत काहीशी मोकळीढाकळी संस्कृती असणाऱ्या गोव्यात आता पर्यटकांवरही बंधने येणार आहेत. मुख्यत्वे समुद्रकिनारे स्वच्छ हवेत यासाठी भाजप सरकारने समुद्रकिनाऱ्यांसह सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास निर्बंध घालण्याची तयारी केली आहे. गोवा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्सो यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले की, समुद्रकिनारे स्वच्छ हवेत. तेथे कोणतेही नियमबाह्य कृत्य केले जाऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांनाही आम्ही रोखत आहोत. वेळप्रसंगी समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांना अटकही केली जाऊ शकते, असे आजगावकर यांनी सभागृहात सांगितले.
पोलिसांकडून ही कारवाई आत्ताही सुरूच आहे. या प्रकरणात काही गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मद्यप्राशन करताना आढळल्यास तुमच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई होऊ शकते. वेळ पडल्यास यामुळे तुम्हाला जेलची हवाही खावी लागेल, त्यामुळे जरा जपूनच असा इशारा देण्यात आला आहे.