बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा


मुंबई: बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. ज्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा भरला नसेल ते आता ४ ऑगस्टपर्यंतही पीक विमा भरू शकतील. पण काही नियम आणि अटी त्यासाठी असतील. ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचा उडालेला फज्जा, त्यानंतर शिवार सोडून शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दारात लावलेल्या रांगा, याचा परिणाम म्हणून यंत्रणेवर पडलेला ताण या पार्श्वभूमीवर सरकारने हा दिलासादायक तोडगा काढला आहे.

बिगर कर्जदार शेतकरी पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरू शकतात. तसेच शेतकऱ्याने जर पीक विम्यासाठी स्वत: अर्ज केला तर तो सुद्धा स्विकारला जाणार आहे. पण त्यासाठी अट अशी आहे की, पीक विमा भरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे ३१ जुलै किंवा त्यापूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाण पत्र ज्या शेतकऱ्यांकडे असेल ते शेतकरी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यासाठी पात्र असतील.

दरम्यान, सरकारने पीक विमा भरण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठीही मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ ३१ जुलैवरून ५ ऑगस्ट अशी करण्यात आली होती. पण कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी अशा दोघांनाही आता मुदतवाढ मिळाली असल्यामुळे पीक विमा भरण्याचा दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.

Leave a Comment