विविधतेतून एकता हे भारताचे खास वैशिष्ठ आहे. त्याचे प्रतिबिंब येथील वास्तूरचनेवरही पडलेले दिसते. असेच एक विशेष शिवमंदिर राजस्थानात असून त्याचे नांव आहे झारखंड महादेव मंदिर. जयपूर जवळच्या प्रेमपुरा नावाच्या गावात हे मंदिर आहे. या महादेवाची प्रसिद्धी दूरवर पसरलेली आहे. श्रावणात शिवउपासेनेला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे श्रावणात या मंदिरातही मोठ्या संख्येने भाविक येतात.
विविधतेतून एकता दाखविणारे झारखंड शिवमंदिर
राजस्तानसारख्या वाळवंटी भागात असूनही प्रेमपुरा गावात दाट झाडी आहे. चोहोकडे डेरेडार वृक्ष आहेत. येथे आल्यानंतर हरभर्या झारखंडची आठवण येतेच. यामुळेच मंदिराचे नांव झारखंड महादेव मंदिर पडले आहे. १९१८ साली सुरवातीला येथे महादेवाची पिंडी व चार बाजूला बांधलेल्या भितींचा त्याला आडोसा इतकेच त्याचे स्वरूप होते.२००० साली त्याचा जीर्णोद्धार केला गेला व आत्ताचे भव्य रूप या मंदिराला प्राप्त झाले.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे याचा कळस दाक्षिणात्य पद्धतीचा आहे. गाभारा व मुख्य द्वार यांच्या मध्येच एक झाड आहे. मंदिर निर्माणाची जबाबदारी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जयप्रकाश सोमाणी यांच्यावर होती. ते अनेकदा दक्षिणेचा दौरा करत असत.त्यांना तेथील मंदिराचे स्थापत्य फार आवडते. त्यामुळे सोमाणी यांनी दक्षिणेतून ३०० कलाकार आणून या मंदिराचे स्थापत्यही दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणे करून घेतले आहे.