या सर्वमान्य बोधचिन्हांचा अर्थ तुम्ही जाणता?


आजकाल सोशलमिडीया मुळे इमोजीची ओळख आपल्या सर्वांना झाली आहे. आपल्या विविध भावना व्यक्त करणार्‍या या प्रतिमा. इमोजी वापरायचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशाच वेळी कांही संदेश देण्यासाठी, सूचना देण्यासाठी कांही चिन्हे वापरली जातात. सर्व जगभर ती वापरात आहे. आपणही ती अनेकदा पाहतो. पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच


मेल सिंबॉल- पुरूषांसाठी हे चिन्ह वापरात आहे. यात एक वर्तुळ व त्याच्या टोकावर एका बाजूला बाण किंवा भाला. हे मंगळाचे प्रतीकही मानले जाते. रोमनांची युद्ध देवता मार्स म्हणजे मंगळाचे भाला हे प्रतीक आहे.

फिमेल सिंबॉल- महिलांसाठी दाखविले जाणारे हे चिन्ह. यातही वर्तुळाला खालच्या तिरक्या बाजूवर अधिकची खूण केलेली असते. हे रोमन देवता व्हीनस चे प्रतीक आहे. यातील वर्तुळ म्हणजे गर्भाशय असून जन्मापूर्वी येथूनच प्रेम व अध्यात्माची सुरवात झाली असे मानले जाते.


धोका- हे मृत्यूचे प्रतीक. आजही जेथे धोका आहे त्याजागी ही साईन वापरली जाते. मध्य युगात समुद्री चाचे लोकांना इशारा देण्यासाठी त्याचा वापर करत असत. कवटी व त्याखाली दोन हाडांची फुली या रूपातील हे चिन्ह विषारी पदार्थ,स्फोटके यांच्या खोक्यांवर, ते वाहून नेणार्‍या टँकरवर पाहायला मिळते.


दिल- लाल बदामाच्या प्रतीकाचा वापर हृदय दर्शविण्यासाठी केला जातो. प्रेमाची भावना त्यातून व्यक्त केली जाते. प्राचीन ग्रीस मधील सिलफिम या औषधी झुडपासाठी प्रथम या प्रतिमेचा वापर केला गेला. या वनस्पतीचा वापर जेवणात केला जात असे. त्यामुळे कुटुब नियंत्रण करता येत असे तसेच कांही महत्त्वाच्या रोगातही ती उपयुक्त होती.


व्ही – हाताची पहिली दोन बोटे उंचावून ही साईन दिली जाते. विजय, यश, अनुमोदन दर्शविण्यासाठी ही साईन प्रामुख्याने वापरली जाते तरी कांही ठिकाणी ती अनादर दर्शविण्यासाठी अथवा धोका दर्शविण्यासाठीही वापरली जाते.

स्वस्तिक- हिंदू धर्मात खास स्थान असलेले स्वस्तिक हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. ही मांगल्याची खूण आहे. तसेच शुभकामना दर्शविणारी खूण आहे.


ओके- हाताची तर्जनी आणि अंगठा एकत्र जुळवून ओ च्या आकाराची ही खूण दाखविली जाते.याचा अर्थ सर्वकांही ठिकठाक असा घ्यायचा असतो. अमेरिकेत ही साईन मोठ्या प्रमाणावर वापरात आहे मात्र अन्य युरोपिय देशात ती असभ्य मानली जाते.

शांतीचे प्रतीक- एका वर्तुळात उभी रेषा व त्याच्या बुडापासून काढलेल्या दोन तिरप्या रेषा. अणुयुद्धा विरूद्ध जी कृती समिती नेमली गेली तेव्हा शांतीचे बोधचिन्ह म्हणून ही प्रतिमा वापरात आली. १९५८ साली गेराल्ड हर्बर्ट यांनी ही प्रतिमा वापरात आणली. आजही ही प्रतीमा याचसाठी वापरली जाते.


हसरा सूर्य- आपण आज हसणे किवा आनंद दाखविण्यासाठी जी इमोजी वापरतो ती पूर्वीपासूनच वापरात आहे. पिवळ्या गोलात स्माईल दाखविणारी ही प्रतिमा सूर्यावरून कल्पिली गेली आहे. आनंदाचे प्रतिनिधित्व करणारी ही प्रतीमा १९७० पासून वापरता आहे.


रेडिएशन सिंबॉल – रेडिओ अॅक्टीव्ह पदार्थांची सूचना देण्यासाठी म्हणजे रेडिएशनपासून सावधानतेचा इशारा देणारी ही प्रतिमा. १९४६ साली अणु किरणोत्सर्जनचे प्रतिक म्हणून हे डिझाईन तयार केले गेले. हे डिझाईन दिसेल तेथे धोका आहे असे नक्की समजायचे.