मुकेश अंबानी आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती


नवी दिल्ली – आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी हे समोर आले असून संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींनी चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या नुसार, यंदाच्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १२.१ अब्ज डॉलर वाढ झाली आहे.

मुकेश अंबानींच्या नावे हा नवा रेकॉर्ड रिलायन्सच्या शेअर्सनं उसळी घेतल्यानंतर झाला आहे. मुकेश अंबानींची आता एकूण संपत्ती ३४.८ अब्ज डॉलर झाली आहे. तर चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांची एकूण संपत्ती ३३.३ अब्ज डॉलर एवढी आहे. ली का शिंग यांच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात फक्त ४.८५ अब्ज डॉलरची भर पडली आहे. रिलायन्सने गेल्या महिन्यात १५०० रुपयांच्या फोनच्या लाँचिंगची घोषणा केल्यानंतर जिओचा शेअर बाजारातील स्तर उंचावला आहे.

रिपोर्टनुसार, १५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जिओमुळे कंपनीचे कर्ज पोहोचले आहे. जिओसाठी मुकेश अंबानींनी आतापर्यंत ३१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीला ९० टक्के कमाई ही पेट्रोकेमिकल, रिफायनिंगमधून होते. त्याच्यासोबतच रिटेल, मीडिया आणि नैसर्गिक गॅसच्या मायनिंगमधूनही पैसा मिळतो. २१ जुलै रोजी झालेल्या एका बैठकीत अंबानींनी जिओला संपत्तीतील दागिना अशी उपमा दिली होती. तसेच येत्या काळात जिओ देशातील सर्वात मोठा डेटा सुविधा पुरवठादार, उत्पादने आणि अॅप्लिकेशनचा प्लॅटफॉर्म बनेल.

Leave a Comment