वय १६ वर्षे; शैक्षणिक पात्रता १२वी आणि दरमहा १२ लाख पगार


चंदिगड: आपल्यापैकी अनेकांना बातमीचे शीर्षक वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे. कारण, आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षे खर्ची घातल्यावर आपल्यापैकी अनेकांचा एकूण पगार १२ लाख होतो आणि त्यातही एवढा पगार मिळवण्यासाठी जे शिक्षण आणि वय लागते त्याचेही एक वेगळे गणित असते. त्यातही त्यासाठी लागणाऱ्या अनुभवाबाबतचा मुद्दाच वेगळा असतो. पण, इयत्ता १२वीत शिकणाऱ्या एका मुलाने जॉब आणि पगाराबाबतच्या या सर्वच संकल्पना उधळून दिल्या आहेत. या विद्यार्थ्याचे नाव हर्षित शर्मा असे असून, तो सध्या १६ वर्षांचा आहे.

इंटरनेट सर्च इंजिन गूगलने हर्षितला आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केले आहे. नुकतीच हर्ष‍ितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून १२वीची परिक्षा दिली आहे. दरम्यान, त्याचा प्रवास मिळालेल्या संधीमुळे लवकरच अमेरिकेच्या दिशेने सुरू होणार असल्यामुळे त्याचे पूढील शिक्षण कदाचित अमेरिकेतच होण्याची शक्यता आहे. तो याच महिन्यात अमेरिकेत असेन. हार्षितची निवड ज्या प्रोग्रामसाठी झाली आहे तो गुगलचा स्पेशल प्रोग्राम असून, या प्रोग्रामसाठी त्याला एक वर्ष खास ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान, त्याला ४ लाख रूपये पगार असेल. ट्रेनिंग संपताच त्याला दरमहा १२ लाख रूपये पगार मिळणार आहे.

हर्षित आपल्याला मिळालेल्या संधीबाबत सांगताना म्हणतो, इंटरनेटवर मला विविध प्रकारचे संशोधन करायला आवडते. एक दिवस जॉब सर्च करत असताना मला गूगल आयकॉन डिजाइनिंगबाबत समजले. मला ग्राफिक्स डिजायनिंगचे आवड होतीच. मी जी गेली १० वर्षे मोठ्या आवडीने जपत आलो आहे आणि सहजच अर्ज भरला. अर्ज केल्यानंतर माझी ऑनलाईन मुलाखतही झाली. त्यानंतर मी जे पोस्टर डिझाईन केले त्यावरच मला ही संधी मिळाल्याचे हर्षित सांगतो.

दरम्यान, हर्षितचे आई-वडील हे पेशाने शिक्षक आहेत. तर, लहान भाऊ सध्या इयत्ता १० वीत शिकत आहे. शिक्षणानिमित्त हर्षित सध्या त्याच्या काकांकडे राहतो. हर्ष‍ितला प्रधानमंत्री डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत ७००० रुपयांचे बक्षिस देऊनही गौरविण्यात आले आहे.