मायावतीचा दणका


बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहेन मायावती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा त्याग करून आता लोकसभेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. आपण राज्यसभेचा त्याग केल्यामुळे म्हणजेच आपल्या निषेधात कृतीमुळे सरकारला हादरा बसला असून सरकारची प्रतिमा दलित आणि मुस्लीम समाजात पूर्णपणे मलीन झाली आहे आणि आता ती अधिक मलीन करण्यासाठी आपल्याला कंबर कसायची आहे असा आव आणून मायावती आता मैदानात उतरणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दर महिन्याच्या १८ तारखेला उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक विभागीय केंद्रात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा भरवण्याची आणि त्यातून सरकारच्या विषयीचा असंतोष पराकोटीला नेण्याची योजना आखली आहे. आपल्या या योजनेमुळे सरकारचे धाबे दणाणले असून सरकार आपल्याला शरण आल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे गणित आहे. मोदी सरकारचे आता बारा वाजले आहेत आणि कोणत्याही क्षणी त्यांच्या पापाचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा एकंदरीत राजकीय आडाखा आहे.

या दृष्टीने मायावती तयारीला लागल्या असतानाच त्यांच्या सगळ्या दाव्यातला फोलपणा एकाच घटनेतून प्रकट झाला आहे. मायावती या मेळाव्याच्या तयारीत असतानाच अमित शहा यांचा उत्तर प्रदेश दौरा सुरू झाला आणि त्यांचे उत्तर प्रदेशात स्वागत करण्यासाठी बसपाच्या एका विधानपरिषद सदस्याने पक्षाचा त्याग करून भाजपाशी जवळीक केली. मायावती यांनी नैतिकतेच्या आणि सरकार हादरल्याच्या कितीही बढाया मारल्या असल्या तरी सरकारच्या ऐवजी या एका आमदाराच्या पक्षांतराने त्यांनाच हादरा बसण्याची वेळ आली आहे. मायावती यांचा हा नैतिक अवतार एरवी सरकारला हादरवणारा ठरू शकला असता परंतु त्यांची आजपर्यंतची वाटचाल त्यांचा कसलाही नैतिक दरारा निर्माण करणारी नसल्यामुळे त्यांचे हे सारे नैतिकतचे नाटक सोनिया गांधी यांच्या त्यागाच्या नाटकासारखेच फियास्को ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींनी २००४ साली अचानकपणे चालून आलेले पंतप्रधानपद नाकारले आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या हाती हे पद सोपवून त्यांचे कळसूत्रे बाहुले करून टाकले. सारी सूत्रे हातात ठेवून पंतप्रधानपद नाकारण्यामागचा आपला त्यागाचा आव किती नकली होता हे अनेकवेळा दाखवून दिले. तसाच प्रकार मायावतींच्या बाबतीत होण्याची शक्यता आता दिसत आहे. कारण मायावतींच्या या राजकारणामागे कसलीही नैतिकता नसून आपली मागासवर्गीयांची मतपेढी घट्ट करून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आहे.

बहेन मायावती यांचा बहुजन समाजवादी पार्टी हा पक्ष दलितांचा पक्ष म्हणून स्थापन झाला आणि सुरूवातीची काही वर्षे तरी मायावतींनी उत्तर प्रदेशातल्या दलितांच्या मतांवर चांगलेच वर्चस्व गाजवले. सध्याच्या राजकारणामध्ये जिथे जातीपातींची गणिते प्रभावी होत चालली आहेत तिथे सुमारे २८ टक्के मतदारांची मतपेढी एका व्यक्तीच्या मागे जवळपास १५ वर्षे एकमुखाने उभी राहिली. ही गोष्ट त्यांचे नेतृत्व कौशल्य प्रकट करणारीच होती. मात्र मायावतींनी ही मतपेढी कायम टिकवून मतांची बेरीज करायला सुरूवात केली आणि सोशल इंजिनिअरिंंगच्या नावाखाली अन्य जातींच्या लोकांनाही आपल्या पंखाखाली घेण्याचा आटापिटा सुरू केला. पक्षाच्या उभारणीच्या सुरूवातीच्या काळा मनुवादी शक्ती आणि ब्राह्मण समाज यांच्यावर कठोर प्रहार करणार्‍या मायावतींनी घूमजाव करून ब्राह्मणांनाही जवळ करण्याची चाल खेळायला सुरूवात केली. आपण ब्राह्मणांना जवळ केले तरी आपली हक्काची २८ टक्के दलित मतांची मतपेढी अजिबात विस्कळीत होणार नाही, ती तर आपल्या शब्दावर वाट्टेल तशी वळवता येईल असा त्यांचा भ्रम होता.

दलितांना सामाजिक उतरंडीमध्ये खालचे स्थान देणारे ब्राह्मणही मायावतींना हवे होते आणि दलितही आपल्याच इशार्‍यावर नाचायला हवे होते. अशा दोन्हीही डगरींवर हात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मायाावतींचा ब्राह्मण विरोध आणि मनुवाद विरोध हे दोन्हीही बेगडी आहेत. ज्या मनुवाद्यांना शिव्या घालतील त्याच मनुवाद्यांना त्या सत्तेसाठी जवळ करायला मागेपुढे पाहणार नाहीत. ही त्यांची दुहेरी नीती त्यांच्या विषयी दलित मतदारांच्या मनात संदेह निर्माण करून गेली. असे असले तरी ब्राह्मणही त्यांच्याजवळ आलेच नाहीत. म्हणजे बाबाही गेला आणि दशम्याही गेल्या अशी त्यांची स्थिती झाली. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव आणि नितीशकुमार तसेच रामविलास पासवान या उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या नेत्यांची राजकीय गणिते काही विशिष्ट जातींच्या आधारावर मांडली गेलेली आहेत. या नेत्यांनी आपला मतांचा मूळ आधार म्हणजे आपली जात कधी सोडलेेली नाही. विजय झाला तरी जातीमुळेच आणि पराभव झाला तरी जातीमुळेच असे म्हणून सगळ्या अवस्थांत हे चारही नेते आपल्या जातीला चिकटून बसले आहेत. त्यांनी आपल्या जातीला सोडून कधीही आपला मतांचा आधार व्यापक करण्याचा आटापिटा केलेला नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण त्यांच्यापुरते का होईना यशस्वी होत आलेले आहे. त्यांना व्यापक जनाधार मिळवण्याचा मोह कधी झालेला नाही. पण मायावतींनी मात्र याबाबत धरसोड केलेली आहे. त्यामुळे त्यांचे नैतिकतेचे नाटक फार सुखावह होईल असे काही दिसत नाही.

Leave a Comment