पाकिस्तानातील पेचप्रसंग


पाकिस्तानातले नेते फारच भ्रष्ट आहेत. अर्थात याचा अर्थ भारतातले नेते कमी भ्रष्ट आहेत असा होत नाही. परंतु एकूणच आशिया खंडामध्ये राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रमाण फार आहे. देशात भरपूर पैसा खावून तो परदेशात नेऊन ठेवायचा आणि राजकारणातून किंवा उद्योगातून निवृत्त व्हायची वेळ आली की त्या पैशातून परदेशात कमावलेल्या मालमत्तेचा उपभोग घेत जीवन कंठायचे अशी अनेक नेत्यांची जीवनशैली ठरलेली आहे. भारतात सध्या सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव, पी. चिदंबरम्, सुरेश कलमाडी, अजित पवार, छगन भुजबळ, ए. राजा, कनिमोझी, शशिकला, जगनमोहन रेड्डी अशा कितीतरी नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा प्रचंड गवगवा सुरू आहे. भारतात तर तो नेहमी सुरू असतो. मग भारताचाच छोटा भाऊ असलेल्या पाकिस्तानात तो का सुरू असू नये. पाकिस्तानातला भ्रष्टाचार जरा वेगळा आहे. पाकिस्तानात तो अतोनात प्रमाणात केला जातो. जनरल मुशर्रफ हे पाकिस्तानचे अध्यक्ष असताना त्यांची उंची राहणीमान आणि पैसा यांची बरीच माहिती उघड झाली होती.

ते लोक एवढा पैसा खातात की त्या पैशाचे काय करावे असा त्यांनाच प्रश्‍न पडतो. मुशर्रफ आणि आताचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी खाल्लेल्या पैशाचा विनियोग घराभोवतीच्या बागेतील झाडांना पाण्याऐवजी दूध देऊन केला जातो असे एका पाकिस्तानी पत्रकारानेच म्हटले होते. नवाज शरीफ यांच्या पूर्वी म्हणजे ९० च्या दशकामध्ये पंतप्रधान असलेल्या बेनझीर भुट्टो यांच्या पतीचे नाव तर मि. टेन पर्सेंट असे होते. म्हणजे सरकारच्या कोणत्याही योजनेतून एखाद्या कंत्राटदाराला कंत्राट मंजूर झाले तर त्यातले १० टक्के एवढे पैसे आसिफ झरदारीला म्हणजे या गृहस्थाला द्यावे लागत असत. पाकिस्तानातल्या अशा बहुतेक राज्यकर्त्यांनी गिळलेल्या पैशातून प्रामुख्याने ब्रिटनमध्ये किंवा आखाती देशांमध्ये मालमत्ता कमावलेल्या आहेत. त्याच परंपरेत नवाज शरीफ यांनीही सत्तेच्या बळावर मनमानी करत पैसा खाल्ला आणि आपल्या मुलांच्या नावाने परदेशात मोठ्या मालमत्ता विकत घेतल्या असा त्यांच्यावर आरोप होता. त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने १० जुलैला आपला अहवाल सादर केला. त्यात नवाज शरीफ यांनी आपल्या मुलांच्या आणि मुलीच्या नावाने परदेशात बर्‍याच मालमत्ता खरेदी केल्या असल्याचे म्हटले आहे. या अहवालामध्ये नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून बडतर्फ करावे आणि जन्मभरासाठी पुन्हा निवडणुकीला उभे राहण्यास अपात्र ठरवावे असे सूचित केले होते.

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी काल आपला निर्णय दिला आणि ही शिफारस अंमलात आणण्याचा आदेश दिला. पाकिस्तानात कोणी कितीही भ्रष्टाचार केला तरीही त्याचा पोलखोल फारशा प्रभावीपणे होत नाही. परंतु पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेता इम्रान खान याने नवाज शरीफ यांचा पिच्छाच पुरवला होता. शरीफ यांनी राजीनामा देऊन नव्याने निवडणुका घ्याव्यात असा त्याचा तगादा होता. मुळात शरीफ यांना पंतप्रधान करणारी जी निवडणूक झाली ती २०१३ सालची पार्लमेंटची निवडणूक ही भ्रष्ट मार्गाने लढवली गेली होती. असा इम्रान खानचा आरोप होता आणि त्यासाठी त्याने आता मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची ही घोषणा ताजी असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आला आणि इम्रान खानला सुंठेवाचून खोकला गेल्याचा आनंद झाला. आता त्याने आपले आंदोलन स्थगित केले आहे. कारण आंदोलन न करताच नवाज शरीफ पायउतार झाले आहेत.

नवाज शरीफ तीन वेळा पंतप्रधान झाले. परंतु तिन्ही वेळा काही ना काही कारणाने त्यांना पंतप्रधान पदाची मुदत पूर्णपणे उपभोगता आली नाही. १९९९ साली तर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना बडतर्फ केले आणि बेनझीर भुट्टोचे वडील झुल्फीकार अली भुट्टो यांच्या प्रमाणेच त्यांना खोट्या खून खटल्यात गुंतवून फासावर लटकवण्याची तयारी सुरू केली. एकदा देशातले लष्कर विरोधात गेले की पाकिस्तानामध्ये कितीही मोठा सत्ताधारी शरण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पंतप्रधान असलेल्या नवाज शरीफ यांना गयावया करून जीवदान मागावे लागले. सौदी अरबस्तानने मध्यस्थी करून त्यांची सुटका केली. त्यामुळे जीवावरचा प्रसंग पलायनावर निभावला आणि शरीफ यांना २००० साली विजनवासात जावे लागले. विजनवासातून परत येऊन ते पंतप्रधान झाले खरे पण तेव्हाही त्यांची मुदत अर्धवटच राहिली. आता त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान पदावरून मुदतपूर्व पायउतार व्हावे लागले आहे. पाकिस्तानात आता त्यांच्याएवढा अनुभवी तसेच जनतेला मान्य होणारा नेता कोणी उरलेला नाही. अर्थात त्यामुळे त्यांचे पद काही मोकळे राहणार नाही मात्र पाकिस्तानात त्यांच्या बडतर्फीने एक राजकीय पोकळी निर्माण होऊन काही काळ तरी देशात अराजक माजणार आहे. पाकिस्तानात ७० वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात जेमतेम २५ वर्षेसुध्दा जनतेचे राज्य आलेले नाही. दीर्घकाळ लष्कराचीच सत्ता राहिलेली आहे आणि आताही कोणत्याही क्षणी लष्कर देशाचा ताबा घेऊ शकते अशी स्थिती आहे.

Leave a Comment