आताच्या तरूणाईचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे बालपण दूरदर्शन म्हणजे डीडी पाहून गेल्यामुळे कुणाला दूरदर्शन माहित नाही असे नाही. दूरदर्शनचा लोगो आठवला तरीही बालपणात ही पिढी रमते. आता ५८ वर्षे या दूरदर्शनच्या लोगोला होत असल्यामुळे आता डीडीने नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे. तब्बल १ लाख रूपयांचे बक्षीसही यासाठी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही सुंदर लोगो पाठवून तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस दूरदर्शनडून मिळवू शकता.
बनवा दूरदर्शनचा आकर्षक लोगो आणि मिळवा १ लाख रुपये
याबाबत माहिती देताना डीडीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांच्या आठवणी दूरदर्शनच्या लोगोसोबत जोडल्या गेल्या आहेत. तरूणांच्या नव्या पिढीला खासगी वाहिन्यांच्या तुलनेत याच्याशी जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठीच डीडी आता नवा लोगो आणण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेसाठी डीडी सर्व भारतीयांना आंमत्रित करीत आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला आपल्या लोगोच्या डिझाइनवर कॉपीराईटचा अधिकार ठेवता येणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दूरदर्शनच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.