कॉंग्रेसला धक्के


गुजरातेत शंकरसिंग वाघेला यांनी कॉंग्रेसचा त्याग करून पक्षाला धक्का दिला पण त्या पाठोपाठ अपेक्षेप्रमाणे भाजपात प्रवेश केला नाही त्यामुळे कॉंग्रेस हायकमांडला जरा तरी दिलासा मिळाला होता. या घटना होत असतानाच राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसला नवे धक्के बसायला लागले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या काही आमदारांंनी कोविंद यांना मतदान केले होते. पर्यायाने हे डझनभर आमदार पक्षातून गेल्यातच जमा होते पण वाघेला यांनी भाजपात जाणार नाही असा निर्वाळा दिल्याने या आमदारांचा काही उपद्रव होणार नाही अशी आशा कॉंग्रेस नेत्यांना वाटत होती.

मात्र आता एकेक करून सहा आमदारांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. परिणामी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या अहंमद पटेल यांची निवड अडचणीत सापडली आहे. कॉंग्रेसचे ४० ते ४५ आमदार पक्षात टिकले तरीही अहंमद पटेल यांची निवडणूक सोपी जाणार आहे. आता ही संख्या ५१ पर्यंत खाली आली आहे. आता ही घसरण बंद व्हावी म्हणून अहंमद पटेल सगळ्या कॉंग्रेस आमदारांना फोन करीत आहेत पण त्यातल्या १८ आमदारांचे फोन लागतच नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. कॉंग्रेसचे बरेच आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या मन:स्थितीत आहेत. भाजपाने अशा फुटून आलेल्या एका आमदारालाच राज्यसभेची उमेदवारी देऊ केले आहे. या प्रकारांनी कॉंग्रेस पक्षाची चिडचिड व्हायला लागली आहे.

काल राज्यसभेत कॉंग्रेसच्या खासदारांनी यावरून गोंधळ घातला. भाजपाच्या हातात सत्ता आहे आणि तिचा गैरवापर करून आमदार फोडले जात आहेत अशी तक्रार त्यांनी केली पण राज्यसभेच्या उपसभापतींनी ही तक्रार फेटाळून लावली आणि यावर आपण काहीच करू शकत नाही, हा विषय राज्यसभेच्या कक्षेेतला नाही असा निकाल दिला. त्यामुुळे तर कॉंग्रेसचे खासदार फारच चिडले. तिकडे हार्दिक पटेल याचीही अशीच चिडचिड होत आहे. आजवर आपला आणि आपल्या पाटीदार आंदोलनाचा कोणाही राजकीय पक्षाला विरोध नाही असे सांगणारा हार्दिक पटेल हाही या पक्षांतराने अस्वस्थ झाला आहे. त्याने पटेल आमदारांना भाजपात न जाण्याचे आवाहन केले आहे. आपल्या आंदोलनाचा भाजपाला असलेला विरोध त्याला दाबून ठेवता आलेला नाही. अर्थात त्याच्या आवाहनाचा काहीही परिणाम कोणाही आमदारावर होणार नाही.

Leave a Comment