कागदी चलन बंद करणारा पहिला देश ठरणार चीन


कागदी चलन बंद करणारा चीन हा पहिला देश ठरण्याची शक्यता तेथील प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्र “चायना डेली”ने वर्तविली आहे.

गुरुवारी या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, चीन हा कागदी चलन (नोटा) वापरणारा जगातील पहिला देश होता. आता तोच चीन कागदी चलन बंद करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. मोबाईलवरून पैसे देण्याच्या मार्गांची लोकप्रियता वाढल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

सध्या बहुतांश चिनी ग्राहक नगदी पैसे देण्याऐवजी स्मार्टफोनवरून आर्थिक व्यवहार करतात. ऑनलाईन शॉपिंग आणि ई-कॉमर्सची वाढ झाल्यामुळे चीनमध्ये डिजिटल पेमेंटसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

आयआरएस या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार चीनमध्ये 2016 मध्ये थर्ड पार्टी मोबाइल पेमेंटचे एकूण विक्री मूल्य 200 टक्क्यांनी वाढून 38 ट्रिलियन युआन (सुमारे 5.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) इतके झाले आहे.